पुणे : ‘चीनचा झपाट्याने आर्थिक विकास होत आहे. साऊथ एशियामधील छोट्या देशांना कर्जरूपी मदत करून, त्यांच्यावर चीन प्रभाव टाकत आहे. ‘वन बेल्ट -वन रूट’ प्रकल्पातून भविष्यात चीनला वेगवान विकास साधायचा आहे. याचेच धोरण म्हणून चीन श्रीलंकेला मोठ्या प्रमाणात मदत करत असून, तेथील बंदराचा विकास करण्यात येत आहे,’ असे मत तैवान येथील प्रा. डॉ. रॉजर लिऊ यांनी व्यक्त केले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभाग, तसेच यशवंतराव चव्हाण सेंटर आॅफ नॅशनल सिक्युरिटी आणि डिफेन्स अॅनालिसीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘स्ट्रॅटेजिक रिलेव्हन्स आॅफ चायना इन साऊथ एशिया’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या विषयावर मार्गदर्शन करताना लिऊ बोलत होते. या वेळी संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभागाचे प्रा. डॉ. विजय खरे, लेफ्टनंट जनरल चव्हाण तसेच विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.लिऊ म्हणाले की, चीनच्या अनेक प्रातांचा जीडीपी हा काही विकसित देशांएवढा आहे. भविष्यात विकासाचा वेग वाढवण्यासाठी तसेच संपूर्ण जगात आपला प्रभाव पाडण्यासाठी आज चीन अनेक प्रकल्प राबवित आहेत. साऊथ एशियामधील अनेक छोट्या देशांना मोठी कर्ज देऊन तेथील बंदरांचा विकास चीन करत आहेत. भारताला हे धोरण न पटण्यासारखे आहे. चीन सध्य श्रीलंकामधील हंबनतोटा बंदराचा विकास करत आहे. श्रीलंकेसोबत संबंध सुधारण्यावर चीन भर देत आहे. भारताला ही बाब चिंताग्रस्त करणारी आहे. चीनच्या या धोरणाला प्रत्युत्यतर देण्यासाठी भारतानेही पावले उचलली आहेत. मात्र, अनेक धोरणे राबविताना भारत हा साशंक असतो. भविष्यात चीनच्या धोरणाला शह देण्यासाठी जपानची मदत भारत घेऊ शकतो. सध्या साऊथ चायना समुद्रातील देशांशीही संबंध सुधारण्यावर भर देत आहे.
दक्षिण आशियात चीन दबदबा वाढवतोय - डॉ. रॉजर लिऊ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2018 3:49 AM