इंदापूर : इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी झालेल्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी भारताला स्वातंत्र्यानंतर ७४ वर्षांत आपल्याला काय मिळाले, याचे आपण अवलोकन केले तर आपण लोकशाही मिळवली. जगाला भारतीय लोकशाहीबद्दल हेवा वाटतो एवढे कर्तृत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेचा आधार ठेवून अनेक पिढ्या, अनेक पक्ष, अनेक नेते या ७४ वर्षांत पुढे आले.
अनेक सरकार आले, अनेक सरकार गेली; परंतु आपल्या लोकशाहीचा आराखडा (ढाचा) अबाधित राहिला आहे. हे मोठे योगदान आपल्याला मिळाले असल्याचे मत या वेळी त्यांनी व्यक्त केले.
प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी महाविद्यालयातील विविध उपक्रम तसेच नव्याने सुरू होणारे अभ्यासक्रम या विषयाची माहिती दिली.
या वेळी संस्थेचे सहसचिव प्रा. बाळासाहेब खटके, मुख्य सचिव मुकुंद शहा, खजिनदार ॲड. मनोहर चौधरी, विकास मोरे, नारायणदास रामदास प्रशालेचे मुख्याध्यापक विकास फलफले, क्रीडा शिक्षक बापू घोगरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लेफ्टनंट प्रा. बाळासाहेब काळे यांनी केले. आभार उपप्राचार्य प्रा. नागनाथ ढवळे यांनी मानले.
इंदापूर महाविद्यालयात स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण करताना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व मान्यवर.