पुणे : शहरातील तीस हजाराच्या आसपास पोहचलेली सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या व जिल्ह्यासह आसपासच्या जिल्ह्यातील कोरोनाबाधित, या सर्वांना उपचारासाठी आशेचा किरण हा पुणे शहरच आहे़ परंतु, या हजारोंच्या संख्येतील रूग्णांपैकी रूग्णालयात उपचाराची गरज असलेल्यांना, वेळेवर बेड (खाटा) मिळणे आजमितीला अशक्य झाले आहे़ सध्या शहरात सर्व मिळून २ हजार ९०० आॅक्सिजन बेड असून, रूग्णांची वाढती संख्या पाहता भविष्यात हा ताळमेळ बसणार का ? असा प्रश्न प्रशासनासमोर उभा राहिला आहे़
कोरोना आपत्ती शहरात मोठ्या प्रमाणात वाढली असताना म्हणजेच सप्टेंबर,२०२० मध्ये शहरात सरकारी, महापालिकेच्या व खाजगी रूग्णालयांमध्ये सर्व मिळून २ हजार ७०० च्या आसपास आॅक्सिजन बेड उपलब्ध होते़ वर्षभराने त्यात २०० ने वाढ झाली असली तरी, पहिल्या लाटेतील वाढ व आत्ताची वाढ लक्षात घेता, हेही बेड कमी पडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत़
सद्यस्थितीला कोरोनाबाधितांपैकी ८० ते ९० टक्के रूग्ण गृह विलगीकरण (होम आयसोलेशन) चा पर्याय स्विकारत असले तरी, दररोजची शहरातील तीन हजारांची वाढ पाहता यापैकी दोनशे ते तीनशे जणांना रूग्णालयांत दाखल करण्याची वेळ काही प्रसंगी येत आहे़ यापैकी बहुतांशी जणांना केवळ आॅक्सिजन बेडचीच नितांत आवश्यकता भासत आहे़ दरम्यान पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातून व आसपासच्या जिल्ह्यातूनही पुणे शहरात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित उपचारासाठी येत आहेत़ यामुळे शहरातील उपलब्ध बेड संख्या किती व कशी वाढवावी याबाबत आता प्रश्न निर्माण झाला आहे़
-------------------------
शहरातील रूग्णालयात ४ हजार ३५२ बेड
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या कोविड डॅशबोर्डवर शहरातील ९४ (सरकारी, महापालिका व खाजगी) रूग्णालयांमध्ये कोरोनाबाधितांसाठी ४ हजार ३५२ बेड राखीव आहेत़ यापैकी गुरूवारी सायंकाळपर्यंत ८२१ साध्या बेडपैकी १७८ रिक्त होते़ तर २ हजार ८७३ आॅक्सिजन बेडपैकी केवळ ३११ बेड रिक्त राहिले आहेत़ याचबरोबर शहरात सध्या २९१ पैकी २९ आयसीयू बेड व ३६७ पैकी १७ व्हेंटिलेटर बेड उपलब्ध दाखविले जात आहेत़
परंतु, सद्यस्थितीला कुठल्याही रूग्णालयात फोन केल्यावर प्रथम बेड उपलब्ध नाहीत असाच प्रतिसाद मिळत आहे़
-------------------