पुणे : जनजागृतीचा अभाव, सकस आहार आणि उपचारांबाबतची उदासिनता आणि रुग्णालयांकडून उपचारांमध्ये होणारी दिरंगाई अशा कारणांमुळे प्रसुतीदरम्यान महिलांच्या होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण वाढत चालले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडील आकडेवारीनुसार पुण्यातील महिलांचे अशा प्रकारे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण तुलनेने कमी असून परजिल्ह्यामधून उपचारांसाठी आलेल्या महिलांचे प्रमाण अधिक आहे. गेल्या वर्षभरात पुण्यामध्ये ९४ महिलांचा प्रसुतीदरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये महापालिकेच्या हद्दीतील २० महिलांचा समावेश आहे. गरोदर माता मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना राबविण्याबाबत २०१० साली शासनाने आदेश काढला होता. त्यानुसार महापालिकांना समिती स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. पुणे महापालिकेने सर्वात पहिली समिती गठीत केली. या समितीमध्ये पालिकेचे आरोग्य प्रमुख, सहायक आरोग्य अधिकारी, गायनॅक, फिजिशियन आणि भूलतज्ञांचा समावेश करण्यात आला. शासनाच्या सुचनांनुसार सर्व खासगी रुग्णालयांना याविषयी कळविण्यात आले. प्रत्येक रुग्णालयाने याविषयी समन्वय अधिकाऱ्या नेमणूक करावी तसेच गरोदर माता मृत्यूंचा अहवाल पालिकेला पाठविण्याच्या सुचनाही पालिकेने दिल्या. खासगी रुग्णालयांच्या समन्वय अधिकारी आणि डॉक्टर यांना प्रशिक्षणही देण्यात आले. त्यानुसार रुग्णालयांकडून आवश्यक माहिती आणि अर्ज भरुन घेतले जातात. या समितीची दरमहिन्याला बैठक घेतली जाते. पालिकेकडून तीन प्रकारांमध्ये (डिले १ ते डिले ३) या मृत्यूंचे वर्गीकरण केले जाते. पहिल्या प्रकारात प्रसुती वेदना सुरु झाल्यानंतरही महिला रुग्णालयात दाखल झाल्या नाहीत, घरामधूनच विलंब झाल्यामुळे झालेले मृत्यूंचा समावेश करण्यात आला आहे. तर दुसऱ्या प्रकारात एका ठिकाणाहून दुसरीकडे उपचारांसाठी नेत असताना उशीर झाल्यास झालेले मृत्यू आणि तिसऱ्या प्रकारात डॉक्टर आणि रुग्णालयाकडून उपचारांमध्ये दिरंगाई झाली अथवा उशीर लावल्यामुळे झालेल्या मृत्यूंचा समावेश करण्यात आला आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की पहिल्या दोन प्रकारांमुळे सर्वाधिक मृत्यू होतात. तर डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे. गरोदर मातांचा प्रसुतीदरम्यान मृत्यू झाल्यास समितीकडून पडताळणी केली जाते. याबाबतची निरीक्षणे आणि शिफारशी पाठविल्या जातात. त्यानुसार, संबंधित रुग्णालयांवर कारवाई केली जाते. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत २०१८-१९ या वर्षामध्ये प्रसुतीदरम्यान झालेल्या मृत्यूंचे प्रमाण वाढले आहे. रुग्णालयांकडून पुर्वी पालिकेला माहिती दिली जात नव्हती. अलिकडच्या काळात ही माहिती देण्याचे प्रमाण वाढल्याने नेमका आकडा समजण्यास मदत मिळू लागली आहे. परंतू, जनजागृतीचा अभाव, उपचारांपुर्वी अंधश्रद्धांचा वापर आणि उपचारांमधील दिरंगाई यामुळे महिलांना प्राण गमवावे लागत आहेत. ======वर्ष प्रसुतीदरम्यान मृत्यू महापालिका हद्दीतील महिला2014-15 66 262015-16 53 132016-17 49 192017-18 62 192018-19 94 20
पुणे शहरात प्रसुतीदरम्यान महिलांच्या मृत्यूचे प्रमाण वाढतेय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 1:02 PM
गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत २०१८-१९ या वर्षामध्ये प्रसुतीदरम्यान झालेल्या मृत्यूंचे प्रमाण वाढले आहे.
ठळक मुद्देपरजिल्ह्यातील प्रमाण अधिक : मातामृत्यूदर कमी करण्यासाठी जनजागृतीची आवश्यकतापालिकेकडून तीन प्रकारांमध्ये (डिले १ ते डिले ३) या मृत्यूंचे वर्गीकरणडॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण तुलनेने कमी