पुणे : शहरातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या जवळपास तीन हजारांवर पोहचली आहे. याचवेळी शहरात कोरोनाआ रुग्णांना बेड्स च्या उपलब्धतेसह वैद्यकीय उपचार मिळवण्यात अनेकानेक अडचणी येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष व कोथरुड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी महापालिका आयुक्तांना एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
चंद्रकांत पाटील या निवेदनात म्हणाले , पुण्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर खाटा उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत.अशा स्थितीत जम्बो रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरु करण्यात यावे तसेच त्याठिकाणी व्हेंटिलेटरची संख्या वाढवावी.
महापालिकेच्या हेल्पलाईन सेवेबाबत देखील तक्रारी वाढल्या असून ऑपरेटर फोन उचलत नाहीत, त्यांच्याकडे माहिती उपलब्ध नाही यांसारख्या तक्रारींचा ओघ वाढत आहे. या सेवेचा नागरिकांना लाभ व्हावा या दृष्टीने त्वरित कार्यवाही करण्यात यावी अशीही सूचना पाटील यांनी महापालिका आयुक्तांना केली आहे.
पुढे पाटील यांनी खासगी रुग्णालयातील किमान ८०टक्के खाटा ह्या कोरोना रुग्णासाठी राखीव ठेवाव्यात व त्या ताब्यात घेण्याची कार्यवाही त्वरित सुरु करावी अशीही आग्रही मागणी केली आहे.
विविध व्यक्तीगत कारणाने वा जागे आभावी अनेक रुग्णांना घरी विलगीकरणात राहणे शक्य होत नाही, अश्या रुग्णांसाठी विलगीकरण केंद्र तातडीने सुरु करावे.यासह जे रुग्ण घरीच विलगीकरणात राहू शकतात अशांच्या व त्यांच्या नातेवाईकांचे प्रबोधन करून त्यांना रुग्णालयात भरती होण्यापासुन परावृत्त केल्यास अत्यवस्थ व इतर आजार असलेल्या कोरोना रुग्णांसाठी अधिक खाटा उपलब्ध होतील. तरी त्या दृष्टीने प्रयत्न करण्यात यावे म्हणून प्रयत्न होणे गरजेचे आहे.