रावणगाव : राज्य सरकारने गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक भरती प्रक्रिया थांबविलेली असल्यामुळे सेट, नेट, पीएचडी, बी.एड., डी. एड. यासारख्या उच्च पदव्या प्राप्त करून देखील नोकºया मिळेनाशा झाल्या आहेत. मिळाल्या तरी त्या तात्पुरत्या स्वरूपात मिळत असून त्या ठिकाणी देखील भावी शिक्षकांना नाईलाजाने प्रतिमहिना अतिशय तुटपुंज्या पगारवर काम करावे लागत आहे.
शिक्षणासाठी आयुष्यातील वीस -पंचवीस वर्ष खर्च करून देखील शिक्षक भरती प्रक्रिया बंदीमुळे नोकरी मिळण्याची शक्यता कमी असल्याने राज्यातील कायमस्वरूपी नोकरीच्या शोधात असणाºया अनेक भावी शिक्षकांच्या मानसिक ताण - तणावामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून त्यांना आपल्या भविष्याची चिंता सतावत आहे. अनेक कुटुंबातील आर्थिक दृष्ट्या गरीब मुले - मुली कर्ज काढून आपले शिक्षण पूर्ण करीत आहेत. परंतु शिक्षण पूर्ण होऊन देखील कित्येक वर्ष त्यांना कायमस्वरूपी नोकरीच मिळत नसल्यामुळे शिक्षणासाठी काढलेल्या कर्जाचे व्याज देखील ईच्छा असताना ते भरू शकत नाहीत.त्यामुळे अनेक उच्च शिक्षित भावी शिक्षक शाळा, कॉलेजेस मध्ये काही तास नोकरी करून बाकीच्या वेळेत हॉटेल चालविणे, चहाची टपरी टाकणे, गॅरेज टाकणे , कंपनीत पार्ट टाईम काम करणे, पेट्रोल पंपावरती काम करणे, एखादे छोटेसे दुकान टाकणे, अथवा मुलांचे खासगी क्लास घेणे अशा पद्धतीने जोड व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करताना अनेक ठिकाणी दिसून येत आहेत.शिक्षण क्षेत्रातील उच्च पदव्या प्राप्त करून देखील अनेकांना कायमस्वरूपी नोकरीची शाश्वती नसल्यामुळे अशा मुलांचे विवाह होण्यामध्ये अनेक अडथळे येत असल्यामुळे अशा तरुणांसह पालकांच्या चिंतेमध्ये देखील दिवसेंदिवस वाढ होत असून उच्च शिक्षित असताना देखील कायमस्वरूपी नोकरी नाही.त्यामुळे अशा भावी शिक्षकांचे विवाह जुळविण्यामध्ये अनेक अडथळे निर्माण होताना दिसून येत असल्याने त्यांच्या वयामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून अशा तरुणांना आपला विवाह होईल कि नाही याची चिंता वाटू लागली आहे.४तर काही भावी शिक्षक गेल्या अनेक वर्षांपासून भविष्यात कायमस्वरूपी नोकरी मिळेल या कोरड्या आशेवरती शिक्षण संस्थांमध्ये फुकट काम करीत आहेत. या सर्व गोष्टीना शासनाची शिक्षण विषयक असलेली चुकीची धोरणे कारणीभूत असल्यामुळे भावी शिक्षकांमध्ये ताणतणाव तसेच राज्य शासनाविषयी दिवसेंदिवस नाराजी वाढतच चालली असल्याचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळत आहे.