पिंपरी : हाणामारी, तसेच खुनासारख्या गंभीर स्वरूपाच्या गुन्हेगारी घटनांमध्ये दगडांचा वापर होत असतो. चाकू, तलवारी, गुप्ती या हत्यारांचाही वापर आरोपींकडून केला जात आहे. अलीकडच्या काळात गावठी कट्टा अथवा बिगरपरवाना पिस्तुलाचाही सर्रास वापर होत आहे. धारदार शस्त्र अथवा पिस्तुलाच्या धाकाने धमकावण्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. आता तर बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्याचे प्रकार शहरात घडू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कोणाला भंगार मालाच्या साठ्यात, तर कोणाला कचऱ्यात लष्करातील स्फोटके, बॉम्बसदृश वस्तू आढळून येऊ लागल्या आहेत. विश्वनाथ गणपती साळुंखे (वय ५६ , रा. औदुंबर कॉलनी, वाल्हेकरवाडी, चिंचवड) या आरोपीने तर घरकाम करणाऱ्या महिलेला बॉम्बस्फोटात उडवून देण्याची धमकी दिली. त्यानुसार झडती घेतली असता त्याच्या घरात चक्क बॉम्बसदृश वस्तू आढळून आली. वर्षभरापूर्वी काळेवाडीत, थेरगाव येथे तरुणांकडे बॉम्बसदृश वस्तू सापडल्या होत्या. देहूरोडमध्ये भंगारमालात आढळून आलेल्या वस्तूंचा स्फोट घडल्याच्या घटनांची नोंद आहे. अशा प्रकारे स्फोटके कोठेही आढळून येण्याचे प्रकार गंभीर असून, त्यातून सार्वजनिक सुरक्षिततेला धोका पोहोचू शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे. गतवर्षी चऱ्होली खुर्द येथे रस्त्याचे काम सुरू असताना एका पोत्यात चार बॉम्बसदृश वस्तू आढळून आल्या होत्या. पोलीस, बॉम्बशोधक-नाशकपथक आणि खडकी अॅम्युनिशन फॅक्टरीच्या पथकाकडून या वस्तूंची पाहणी करण्यात आली. आळंदी-मरकळ रस्त्यावरून चऱ्होली खुर्द गावाकडे जाण्यासाठी ठेकेदारामार्फत रस्त्याचे काम सुरू आहे. हे काम सुरू असताना रस्त्यात येणाऱ्या एका झाडाजवळ पोत्यामध्ये काही तरी असल्याचे कामगारांनी पाहिले. त्यांनी उघडून पाहिले असता, त्यामध्ये चार बॉम्बसदृश वस्तू असल्याचे दिसून आले होते. त्यानंतर काळेवाडीत एका तरुणाच्या घरात त्याने बॉम्बसदृश वस्तू ठेवल्याचे निदर्शनास आले होते. थेरगावातही बॉम्बसदृश वस्तू बाळगणाऱ्या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. (प्रतिनिधी)
बॉम्बने उडविण्याच्या वाढल्या धमक्या
By admin | Published: January 03, 2017 6:25 AM