इंदापूर (पुणे) : दुचाकीवरुन घरी सोडण्याच्या बहाण्याने ऐंशी वर्षांच्या वृद्धेला मारहाण करुन तिचे दागिने ओरबाडून पळून गेलेल्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हा घडल्यानंतर पाच तासात आरोपीला पकडण्याची कामगिरी इंदापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केली.
दिलीप लक्ष्मण अंकुश (वय ५० वर्षे, रा. सणसर, ता. इंदापूर) असे या चोरट्याचे नाव आहे. औषधे खरेदीसाठी इंदापूरात आलेल्या रुक्मिणी पाडुंरंग करगळ (वय ८० वर्षे रा.वनगळी, ता. इंदापूर) या वृध्देला, ती घराकडे जात असताना, घरी सोडण्याचा बनाव करत आरोपीने आपल्या ताब्यातील लुनावरुन बाह्यवळण रस्त्याने सरडेवाडी टोलनाक्याच्या दिशेने नेले. निर्जनस्थळी नेवून तिला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. मंगळसूत्र, कानातील फुले असा ७० हजार रुपयाचा ऐवज, रोख रक्कम, एस.टी.बसचा पास असा मुद्देमाल त्याने लुटून नेला. दागिने ओरबाडून नेल्याने व मारहाण केल्याने त्या वृध्देच्या गाल, हात व पायांना दुखापत झाली होती. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती.
त्यानंतर ही वृद्ध महिला कशीबशी इंदापूरात पोहोचली. एक परिचयाच्या इसमाने तिला दवाखान्यात दाखल केले. अकरा वाजता ही माहिती इंदापूर पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी दवाखान्यात जाऊन त्या वृद्धेची फिर्याद घेतली. अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे व पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी घटनास्थळास भेट दिली. कारवाईबाबत मार्गदर्शन केले.
पोलीस यंत्रणा तातडीने तपासाला लागली. आरोपीने हेल्मेट घातले होते. त्यामुळे तपासात अडचण येत होती. मात्र गुन्हे शोध पथकाने सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज व तांत्रिक माहिती वरून पाच तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या. पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर धनवे, योगेश लंगुटे, सहाय्यक फौजदार प्रकाश माने, हवालदार ज्ञानेश्वर जाधव, पोलीस नाईक सलमान खान, पोलीस शिपाई नंदू जाधव, गणेश डेरे, मोहन आनंदगावकर, होमगार्ड संग्राम माने, लखन झगडे यांनी या कारवाईत भाग घेतला.