लोकमत न्यूज नेटवर्कबारामती : राज्यातील अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांचे पहिले अधिवेशन इंदापूर येथे जून महिन्यात होणार आहे. अल्पसंख्याक समाजाच्या शैक्षणिक संस्थांच्या अडीअडचणी तसेच विविध योजनांबाबत या अधिवेशनामध्ये चर्चा होणार आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य जैन अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कुलभूषण विभूते यांनी दिली.राज्यातील जैन, मुस्लिम, ख्रिश्चन, ज्यू, पारसी, बौद्ध, शिख या अल्पसंख्याक समाजातील सर्व घटकांसाठी केंद्र व राज्य शासनाकडून विविध योजना राबवण्यात येत असतात. या अधिवेशनाच्या निमित्ताने अल्पसंख्याक समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा होणार आहे. या अधिवेशनाला मुख्यमंत्र्यांसह राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मोहम्मद हुसेन खान हे अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. तर शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, पालकमंत्री गिरीश बापट, अल्पसंख्याक राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार दत्तात्रय भरणे, माजीमंत्री हर्षवर्धन पाटील, जिल्हाधिकारी सौरभ राव, ग्रामीण पोलीस अधिक्षक सुवेझ हक यांच्यासह सर्व मंत्रालय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनाच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजासाठी असणाऱ्या शैक्षणिक, शिष्यवृत्ती, मौलाना आझाद एज्युकेशन फाउंडेशन, केंद्र सरकारच्या १५ कलमी योजनांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच अल्पसंख्याक प्रमाणपत्राचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. अल्पसंख्याक समाजाच्या या पहिल्या अधिवेशनासाठी जैन, मुस्लिम, ख्रिश्चन, ज्यू पारसी, बौद्ध, शिख समाजाच्या अल्पसंख्याक संस्था, फर्म आदींना नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या अधिवेशनासाठी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक अधिकारी-कर्मचारी असोशिएशन, महाराष्ट्र राज्य जैन अल्पसंख्याक समिती, महाराष्ट्रराज्य अल्पसंख्याक संस्थान असोसिएशनचे पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत.
राज्यातील अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांचे पहिले अधिवेशन इंदापूरला
By admin | Published: May 26, 2017 5:44 AM