बाभुळगाव : लोणी देवकर (ता.इंदापूर) एमआयडीसीमधील वाय आक्सिस स्ट्रक्चरल स्टिल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये इंदापूरपोलिसांनी छापा टाकुन ७ लाख ५५ हजार ७०० रूपये किमतीचा अवैध ऑक्सिजन साठा व मुद्देमाल जप्त केला आहे. हा ऑक्सिजन साठा हा संबधित कंपनीने सिलेंडर टाकीमध्ये साठवणूक केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले असून ऑक्सिजन भरलेल्या ५१ सिलेंडर व २१ रिकाम्या टाक्या घटनास्थळावरून जप्त करण्यात आल्या असल्याची माहिती इंदापूर पोलिसांनी दिली आहे.
पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डाॅ.अभिनव देशमुख यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून, इंदापूर प्रभारी पोलीस निरिक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या पथकाने काल(दि.२६) रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास लोणी देवकर एमआयडीसीत ऑक्सिजन सिलेंडरचा अवैध साठा असलेल्या कंपनीवर छापा टाकला. छापामारी दरम्यान तपासणीमध्ये सदर कंपनीत वरील प्रमाणे ऑक्सिजनचा अवैध साठा आढळुन आला. सदर बाबत पोलीसांनी चौकशी केली असता २०२१ या चालु आर्थिक वर्षातील जुलै महिन्यात कंपनीत एकुण १७९ ऑक्सिजन सिलेंडरची आवक झाली असुन त्यामध्ये एक हजार २५३ क्युबेक मिटर इतका ऑक्सिजन आवक झाल्याचे पोलीस चौकशीत समोर आले आहे.
या कारवाईत इंदापूर पोलिसांनी ७ लाख ५५ हजार ७०० रूपये किमतीचा अवैध ऑक्सिजन साठा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत तालुका कार्यकारी दंडाधिकारी तथा प्रभारी तहसिलदार अनिल ठोंबरे यांना माहिती देण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई ही पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर प्रभारी पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्यासह दिपक पालखे, मोहम्मद अली मड्डी, अमोल गारूडी, विनोद मोरे, विक्रम जमादार यांचे पथकाने केली असुन पुढील तपास इंदापूर पोलीस करत आहेत......