इंदापूर : इंदापूरपोलिस ठाण्याअंतर्गत तैनात असलेले, स्थिर सर्वेक्षण पथक ( एस.एस.टी ) पथकाने इंदापूर टोलनाक्यावर गाड्यांची तपासणी करत असताना, तपासणीदरम्यान एका फॉरच्युनर गाडी मध्ये एका पोत्यात, एकूण नऊ लाख सत्तर हजार रुपये आढळून आले आहे. अशी माहिती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांनी दिली.
शनिवार ( दि. ६) रोजी दुपारी ४.३० वाजता पांढऱ्या रंगाची फॉरच्युनर गाडी क्रमांक एम. एच २४ एक्यू १११ गाडीची इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी टोल नाक्यावर तहसिलदार सोनाली मेटकरी, पोलीस उपनिरीक्षक सुशिल लोंढे, पोलीस कॉन्स्टेबल विक्रमसिंह जाधव यांच्या पथकाने तपासणी केली असता, त्या गाडी मध्ये एका पोत्यात एकूण नऊ लाख सत्तर हजारांची रक्कम सापडली.
त्याबाबत गाडीचा चालक विजय नारायण ताटे - देशमुख रा. संगम ता. माळशिरस जि. सोलापूर यांना याबाबत विचारणा केली असता त्यांना त्याबाबत योग्य खुलासा देता आला नाही, म्हणून ही रक्कम जप्त करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंदापूर पोलिसांनी आचारसंहिता भंग होवू नये म्हणून इंदापूर तालुक्यातील सराटी गावात व सरडेवाडी येथील टोल नाक्यावर नाकाबंदी करून चेकपोस्ट लावला आहे. यामध्ये प्रत्येक गाडीची कसून तपासणी केली जात आहे. त्या पथकामध्ये एक पोलीस अधिकारी, तीन पोलीस कर्मचारी व एक कॅमेरामॅन चे पथक तैनात केले आहे.
ज्या गाडीतून रक्कम जप्त करण्यात आली असून, त्यांना इंदापूर पोलिसांनी त्या पैशाबाबत पुरावा सादर करण्याची नोटीस दिली आहे. ती रक्कम सोमवार ( दि.८) रोजी इंदापूर तहसिल कार्यालयात जमा करणार आहेत. त्यानंतर तहसीलदार हे जिल्हाधिकारी यांना याबाबत माहिती देणार आहेत. त्यानंतर आरोपी विजय ताटे - देशमुख यांनी सात दिवसांच्या आत त्या पैशांच्या पुरावा व खुलासा केल्यानंतर, त्यामध्ये योग्य पुरावे असल्यास ते पैसे त्यांना परत मिळणार आहेत. अन्यथा ती रक्कम सरकार जमा होणार आहे.