इंदापूर (पुणे) :इंदापूर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने चोरीस गेलेल्या विविध कंपन्यांच्या सुमारे ९ लाख रुपये किमतीच्या २१ दुचाकी हस्तगत केल्या. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. विनोद महादेव पवार (वय २४, रा. सरस्वतीनगर इंदापूर, जि. पुणे), अतुल मारूती काळे (वय १९, रा. निमगाव, ता. माढा, जि. सोलापूर), योगेश मच्छिंद्र सुरवसे (वय ३२, रा. बार्डी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मागील काही महिन्यांपासून इंदापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले होते. त्या पार्श्वभूमीवर वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याची जबाबदारी गुन्हे शोध पथकास दिली होती.
गुन्हे शोध पथकाने पोलिस ठाणे अभिलेखामधील दुचाकी चोरी करणारे आरोपी व इंदापूर शहर परिसरातील अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून व तांत्रिक माहितीवरून विनोद पवार, अतुल काळे या संशयितांना ताब्यात घेऊन बोलते केले. त्यांनी इंदापूर, टेंभुर्णी, कुर्डूवाडी, फलटण परिसरातून दुचाकी चोरल्याचे कबूल केले. त्यापैकी काही दुचाकी योगेश सुरवसे या तिसऱ्या आरोपीस विकल्याची माहिती दिली. पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले आहे. तिन्ही आरोपींकडून वरील प्रमाणे दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली.
पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सहायक पोलिस निरीक्षक योगेश लंगुटे,सहायक फौजदार प्रकाश माने, ज्ञानेश्वर जाधव, पोलिस नाईक सलमान खान, पोलिस कर्मचारी नंदू जाधव, गजानन वानोळे, होमगार्ड लखन झगडे यांनी ही कारवाई केली आहे.