बाभुळगाव: इंदापूर उपजिल्हा रूग्णांलय कोव्हीड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णावर व्यवस्थित औषधोपचार उपचार केले नाहीत. या कारणांवरून रूग्णांच्या संतप्त नातेवाईकांनी रूग्णालयाच्या कोव्हीड सेंटरमध्ये घुसून २३ वर्षीय महिला वैद्यकिय अधिकारी व सिस्टरला मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
८ मेला दुपारी ही घटना घडली असून याबाबत श्वेता संभाजी कोडक(वैद्यकीय अधिकारी रा इंदापूर) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुनिल चंद्रकांत रणखांबे व रवी चंद्रकांत रणखांबे दोघे रा. इंदापूर अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
श्वेता कोडक या शनिवारी नेहमीप्रमाणे इंदापूर उपजिल्हा रूग्णालय कोव्हीड केअर सेंटरमधील वार्ड क्रमांक मध्ये त्यांचे सिस्टर्स स्टाफसह कर्तव्य बजावत होत्या. त्यावेळी रूग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल रुग्ण चंद्रकांत चन्नाप्पा रणखांबे (वय ५६) यांच्या नातेवाईकांनी कोव्हीड सेंटरमधील वॉर्डमध्ये जबरदस्ती प्रवेश केला. रूग्णालयामध्ये श्वेता कोडक व त्यांच्यासोबत असणाऱ्या परिचारिका यांना त्यांच्या वडीलांवर व्यवस्थित उपचार करत नसल्याच्या कारणावरून शिविगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण करून कोडक आणि त्यांच्या सोबत असलेल्या परिचारिकेला मारहाण केली. इंदापूर पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून ते पुढील तपास करत आहेत.