इंदापूर तालुक्यात पदवीधर ५७.६३ तर शिक्षक मतदारसंघ ८३.६६ टक्के मतदान
इंदापूर : पुणे विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत इंदापूर तालुक्यात पदवीधर मतदारसंघात ५७.६३ टक्के तर शिक्षक मतदारसंघात ८३.६६ टक्के मतदान झाल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी दिली.
करोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंग सॅनिटायझरचा वापर करून प्रशासनाच्यावतीने मतदान सुरू करण्यात आले. पदवीधर मतदारसंघातील १०८५६ मतदारांपैकी ६२५३ पदवीधरांनी मतदानाचा हक्क बजावला तर शिक्षक मतदार संघातील १२२४ मतदारांपैकी १०२४ जणांनी मतदानाचा हक्क बजावला.
पदवीधर मतदार संघाची तालुक्यामध्ये १६ मतदान केंद्रे होती, तर शिक्षक मतदार संघाची पाच मतदान केंद्रावरती मतदान घेण्यात आले. सुरुवातीला सकाळच्या टप्प्यांमध्ये सकाळी दहा वाजेपर्यंत पदवीधर मतदारसंघाची ची टक्केवारी ९. २७ टक्के बारा वाजता २२.६८ टक्के, दोन वाजता ३७.७६ टक्के, चार वाजता ५०. ४६ टक्के तर पाच वाजता ५७.६० टक्के एवढी झाली. त्याचप्रमाणे शिक्षक मतदार संघाची मतदानाची टक्केवारी दहा वाजता १९.१२ टक्के एवढी होती ती बारा वाजता ४२.६५ टक्के , दोन वाजता ६८.७१ टक्के, चार वाजता ८०. २३ ते तर पाच वाजता ८३.६६ टक्के एवढी मतदानाची आकडेवारी होती.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी तसेच जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांनी बावडा या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला तर माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी निमगाव येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.
यावेळी इंदापूर तालुक्यातील आरोग्य सेवेच्या कर्मचाऱ्यांनी दिवसभर सर्व मतदान बुथवर मतदारांची चोख आरोग्य तपासणी केली.
फोटो क्रमांक : ०१इंदापूर पदवीधर मतदान
फोटो ओळ : इंदापूर मतदान केंद्रावर आरोग्य कर्मचारी मतदारांची तपासणी करताना