सागर शिंदे
इंदापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, कोरोना नियंत्रणासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागाला बसत असून, दळणवळण व सार्वजनिक वाहतुकीवर मोठा परिणाम होत आहे. इंदापूर तालुक्यात अंतर्गत होणारी एसटीची वाहतूक ठप्प झाली आहे. महत्त्वाच्या तसेच मोठी वाहतूक असलेल्या मार्गावरील बसच्या सर्व फेऱ्या बंदच आहेत. त्यामुळे गोरगरिबांच्या खिशाला आर्थिक भुर्दंड बसत आहे.
तालुक्याच्या ग्रामीण भागात प्रवासाची व्यवस्था नसल्याने, शेतमाल विक्री, बाजारहाट करण्यासाठी वाहतुकीची सुविधा नाही. तर गावाकडे खरीप हंगामातील बी-बियाणे वाहतूक करण्याची सोय उरली नाही. इंदापूर आगारातून केवळ ११ बसगाड्या बारामती व अकलूज शहरासाठी आगारातून सोडण्यात आलेल्या आहेत. तर बाहेर जिल्ह्यासाठी एकूण २० गाड्या सोडण्यात आल्यामुळे तालुक्यातील अंतर्गत प्रवाशी वाहतूक बंद पडली आहे. ही वाहतूक पुन्हा नव्या जोमाने सुरू करावी अशी मागणी गावागावांतून होत आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, इंदापूर तालुक्याचे ठिकाण हे इंदापूर शहर असून या आगाराच्या ठिकाणाहून, लॉकडाऊन सुरू होण्याअगोदर या आगाराला तब्बल सहा लाखापर्यंतचे उत्पन्न दिवसाला मिळत होते. तालुक्यात जवळपास १०४ गावे आहेत. खासगी प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद झाल्यामुळे गरीब कुटुंबांना दुसरा पर्याय कोणताही राहिलेला नाही.
इंदापूर बस स्थानकाचे आगारप्रमुख मेहबुब मनेर यांना अंतर्गत प्रवाशी वाहतुकीबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, इंदापूर आगारातून सध्या मालवाहतूक करणाऱ्या एसटी बसला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. दर महिन्याला जवळपास तीन लाखांचे उत्त्पन्न आगाराला मिळत आहे. महिन्याला अंदाचे सात हजार किलोमीटर पर्यंत वाहतूक करण्यात येत आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय नियम असल्यामुळे व ग्रामीण भागात प्रवाशांचा प्रतिसाद मिळतो की नाही अशी शंका आहे. इंदापूर आगाराला प्रति दिवसाला दोन लाख साठ हजारापर्यंत उत्पन्न मिळत आहे. सध्या खरीप हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांची सर्वाधिक अडचण होत आहे. अनेक लहान शेतकरी इंदापूरमध्ये दोन युरिया अथवा खत व जनावरांना एक दोन पोती खरेदी करतो. अनेक वेळा गाडी खर्च वाचावा म्हणून महामंडळाचे चालक वाहन शेतकऱ्यांना मदत करतात. तसेच आजारी व्यक्तींना दवाखान्यापर्यंत नेण्यात ग्रामस्थांना शक्य होत नाही. एकूणच सर्व बस फेऱ्या बंद असल्यामुळे, ग्रामीण भागाचा शहरी भागाशी संपर्कच तुटला असल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांना बियाणे, खते खरेदीसाठी तालुका, जिल्ह्याच्या ठिकाणी यावे लागते. शेतमाल विक्रीसाठी बाजार समितीमध्ये तर पीक कर्जासाठी बँकांत ये-जा करावी लागते. परंतु, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाच ठप्प असल्याने शेतकऱ्यांची ही सर्व कामे खोळंबत आहे. एकीकडे पेरणीस योग्य वातावरण तर दुसरीकडे वाहतुकीविना करता येत नसलेले कामकाज अशा कात्रीत शेतकरी वर्ग सापडला आहे.
याशिवाय शाळकरी विद्यार्थ्यांच्या कोचिंग क्लासवर परिणाम झाले आहे. नागरिकांना लगतच्या बाजाराठिकाणी जाण्यात अडचणी येत आहेत.एकूणच ग्रामीण भागातील बसफेऱ्या बंद असल्याने ग्रामीणांचे जनजीवन विस्कळीत होत आहे.
बाजारहाट व शेतमाल विक्रीत मोठे अडसर
ग्रामीण भागातील कामकाज ठप्प झाले तर एसटीचे उत्पन्न बुडत आहे. एसटीतील शेकडो कर्मचारी विनावेतन घरी बसले आहेत. रोजगारच गेल्यामुळे त्यांच्या कुटुंबाच्या होत उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे. तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अर्थात एसटीची चाके जागेवर रुतल्याने ग्रामीण भागातील जनजीवनावर त्याचा विपरीत परिणाम दंड होत आहे. शेती, बैंक, बाजारहाट, आरोग्याशी निगडित कामकाज करणे ग्रामीणांना मोठे जिकिरीचे झाले. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थाच सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून असून, एसटी (लालपरी) ग्रामीण भागातील जीवनवाहिनी आहे. तीच वाहिनी बंद असल्यामुळे ग्रामीण भाग सध्या अविकसित भासत आहे.
फोटो ओळ : इंदापूर आगारात जिल्हा वाहतुकीस उभे असलेली एसटी बस.