सदरची घटना ही दुपारी १:४५ च्या सुमारास घडली असून ही आग शाॅर्टसर्किटने लागल्याची माहिती शाॅपिंग सेंटरचे मालक महादेव सखाराम शिंदे यांनी दिली. यामध्ये महादेव सखाराम शिंदे यांचे प्रसिद्ध शिंदे मावा कुल्फी कारखाना व त्यातील सर्व साहित्य हे आगीत जळून खाक झाले असून, यामध्ये त्यांचे अंदाजे एक कोटी, १० लाख, १० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तर सचिन हणुमंत लोणकर यांचे गाळ्यातील किराणा दुकान जळाले असून, अंदाजे २४ लाख, ८५ रुपयांचा माल जळून गेला आहे. तसेच नामदेव सखाराम शिंदे यांचे दुकान व चक्की जळून अंदाजे ५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
सोमवारी दुपारी कुल्फी कारखान्याला लागलेली आग इतकी भयानक होती की, या आगीत दोन पिकअप चारचाकी गाड्या, ९ फ्रीज, एक मोठा जनरेटर, हार्डनर, कुल्फी कारखान्यातील पॅकिंग मशिनरी, कच्चा माल आगीत जळून खाक झाले. आग लागल्यानंतर अर्ध्या तासाने इंदापूर नगरपरिषद अग्निशामक दलाच्या गाडीने आग विझविण्याचा प्रयत्न केला; परंतु आगीने उग्र रूप धारण केल्याने आग आटोक्यात येत नव्हती. त्यानंतर कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याची अग्निशामक गाडी व नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याची एक गाडी अशा एकूण तीन गाड्या आल्यानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.
इंदापूर नगरपरिषद हद्दीतील बावडा वेस माळी गल्ली येथील कुल्फी कारखान्याला लागलेली भीषण आग.