लासुर्णे: करमाळा येथे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या काढलेल्या प्रतीकात्मक प्रेतयात्रेचे इंदापुर तालुक्यात तीव्र पडसाद उमटले आहेत. प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढणाऱ्या अतुल खुसपे यांच्या प्रतिमेला जोडे मारत इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.
इंदापूर येथील तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अॅड.शुभम निंबाळकर यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी करमाळा येथील अतुल खुस्पे यांच्या पुतळ्याला जोडे मारून आंदोलन केले. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यासाठी उजनी धरणातून पाच टीएमसी पाणी देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यामुळे प्रतीकात्मक प्रेत यात्रा काढणाऱ्या अतुल खुसपे याचा चांगला समाचार घेण्यात आला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने खुसपेच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन करण्यात आले.
यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली . यावेळी इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष अॅड. शुभम निंबाळकर पुणे जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिकेत निंबाळकर, राष्ट्रवादी सोशल मीडियाचे उपाध्यक्ष करण काटे, काकासाहेब जाधव , दादा यादव आदी उपस्थित होते.
...त्यामुळे ‘उजनी’ च्या पाण्यावर इंदापूर तालुक्याचा हक्क
इंदापूर तालुक्यातील ३६ हजार एकर जमीन आणि २८ गावांना उजनी धरणाच्या निर्मिती वेळी जलसमाधी मिळाली आहे, त्यामुळे उजनी धरणातील पाण्यावर इंदापूर तालुक्याचा हक्क आहे आणि आमच्या हक्काचे पाणी हे २२ गावांना मिळवून देण्याचे ऐतिहासिक काम राज्यमंत्री दत्तामामा भरणे यांनी केले आहे .म्हणून आकसापोटी खालच्या पातळीवर जाऊन कोणी बदनामी करणार असेल तर त्याला भविष्यात यापेक्षा तीव्र उत्तर दिले जाईल, अशी प्रतिक्रिया अॅड. शुभम निंबाळकर यांनी लोकमत शी बोलताना दिली.