इंदापूर : दहशतीच्या जोरावर गुंडगिरी करणारांवर कारवाई करावी. या मागणीकडे लक्ष वेधून घेण्यासाठी त्रस्त नागरिकांच्या वतीने, तहसील कार्यालय, इंदापूर पोलीस ठाण्यावर आज (दि. १२ जून) मूकमोर्चा काढण्यात आला.संबंधितांवर १५ जून पर्यंत कारवाई झाली नाही तर १६ जूनला तालुका पातळीवरचा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा तहसील कार्यालयासमोर झालेल्या सभेत काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष अॅड. कृष्णाजी यादव यांनी दिला आहे. अॅड. यादव, समता परिषदेचे पुणे जिल्हाध्यक्ष पांडुरंग शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अनिल राऊत, स्वराज ग्रुपचे प्रमुख अतूल व्यवहारे, संघर्ष समितीचे पदाधिकारी पोपट शिंदे, रमेश शिंदे, कर्मयोगी सहकारीचे उपाध्यक्ष माऊली बनकर, बाजार समितीचे माजी उपसभापती पांडुरंग मारकड, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विलासराव मारकड आदींच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेच्या पटांगणातून मोर्चास सुरुवात झाली.तहसील कार्यालयावर सभा झाली. सभेत बोलताना अॅड. कृष्णाजी यादव गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमुळे सर्वसामान्य लोक, महिला, महाविद्यालयीन युवती, छोटे व्यावसायिक त्रस्त झालेले आहेत. छेडछाड, हप्ता वसुली मारहाणीचे प्रकार यातून सुटका व्हावी, अशी त्यांची मागणी आहे. उग्र आंदोलन करून लोकांना त्रास न करता, आम्ही मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधले आहे. १५ जून पर्यंत कारवाई व्हावी. अन्यथा १६ जून ला तालुकापातळीवरचा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. तहसील कार्यालयातील अधिकारी नेवसे यांनी मोर्चेकऱ्यांचे निवेदन स्वीकारले. मोर्चामध्ये गणेश झगडे, बाळासाहेब व्यवहारे, बाळासाहेब म्हेत्रे, तात्यासाहेब वडापुरे, गजानन गवळी, माजी उपनगराध्यक्ष पांडुरंग शिंदे, दत्ता भिसे, पै. बजरंग राऊत, बाबजी भोंग, संदीप आदलिंग व इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते. (वार्ताहर)
गुंडगिरीविरोधात इंदापूरकरांचा मोर्चा
By admin | Published: June 13, 2014 5:20 AM