पुणे : बँक अधिकाऱ्याकडून बँकेत शिपाई म्हणून काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यासोबत असभ्य वर्तन करुन विनयभंग केला. हा प्रकार मागील तीन महिन्यापासून ते २८ मे रोजी रात्री दहाच्या दरम्यान बंड गार्डन येथील एका बँकेत आणि महिलेच्या मोबाईलवर घडला आहे. याप्रकरणी बँक अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत ४३ वर्षीय महिलेने बंडगार्डन पोलिस ठाण्यात बुधवारी (दि. ५) फिर्याद दिली आहे. यावरून नयनेश वाजकर मोनं (अंदाजे वय ५०) याच्यावर विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी एका नॅशनल बँकेत शिपाई म्हणून काम करतात. तर आरोपी नयनेश मोनं हा बँकेत सिनिअर क्लार्क पदावर कार्यरत आहे.
फिर्यादी महिला बँकेत काम करत असताना एक महिन्यापूर्वी आरोपीने महिलेसोबत असभ्य वर्तन करून त्यांच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. तसेच याबाबत कुठे तक्रार केली तर बघून घेईन अशी धमकी दिली. २८ मे रोजी रात्री दहाच्या सुमारास आरोपीने फिर्यादी यांच्या व्हॉट्स अप क्रमांकावर व्हॉईस कॉल केला. महिलेसोबत अश्लील भाषेत बोलून फोनवर कीस देण्याची मागणी करुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याप्रकरणी महिलेने बुधवारी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक चेतन धनवडे करत आहेत.