पुणे: आज दिवसभर एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत बंद पुकारला होता, त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले होते. कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार महागाई भत्ता 12 टक्क्यांवरू 28 टक्के करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. आता हा बंद कर्मचाऱ्यांनी मागे घेतला आहे.
आजच्या बंदमुळे एसटीची जिल्ह्यातील सर्व वाहतूक ठप्प झाली होती. एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या बंदची कल्पना बऱ्याच प्रवाशांना नव्हती त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. रोज जवळपास 1400 गाडया स्वारगेटला येतात आणि जातात. पण आज बेमुदत बंदमुळे स्वारगेट डेपोतून एकही गाडी सुटली नव्हती. ऐन दिवाळीच्या हंगामात कर्मचाऱ्यांनी बंद पुकारल्याने परिवहनलाही मोठा तोटा झाल्याची शक्यता आहे.
राज्य सरकारच्या विविध विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता मिळावा ही मागणी कर्मचाऱ्यांनी केली होती. तसेच इतर भत्तेही एसटी कर्मचाऱ्यांना लागू करावेत अशी मागणी केली होती. प्रवाशांना ऐन दिवाळत या त्रासाला सामोरे जावे लागले. दोन दिवसांपूर्वी राज्यात एसटीने जवळपास 17 टक्क्यांची भाडेवाढ केली होती. दिवाळीच्या हंगामात ही भाडेवाढ केल्याने प्रवाशांना याची झळ बसत आहे. त्यात आता आजच्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.