पुणे : क्रीडा क्षेत्रातकडे पाहण्याचा पालकांचा दृष्टिकोन बदलला आहे करिअर म्हणून पालक क्रीडा क्षेत्राकडे पाहात आहेत. त्याच्याबरोबर शासनाच्या पातळीवर खेळाडूंना खूप प्रोत्साहन दिले जात आहे त्यामुळे यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीयांनी जशी भरीव कामगिरी केली. तशीच कामगिरी पुढच्या दोन ऑलिंपिक स्पर्धांमध्ये दिसेल आणि भारत ऑलिंपिक स्पर्धेत पदकांची लयलूट करेल, असा विश्वास भारताची सुवर्णकन्या आणि ऑलंपिक खेळाडू, नेमबाज तेजस्विनी सावंत यांनी व्यक्त केला.
पुण्यातील लोकमत भवनमध्ये तेजस्वीनी सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमतचे व्हाईस प्रेसिडेंट निनाद देसाई हे होते. तिरंगी फुग्यांनी सजवलेल्या लोकमतच्या वैशिष्ट्यपूर्ण लाल विटांच्या इमारतीमध्ये अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी तेजस्विनीचे पती समीर दरेकर, लोकमतचे अधिकारी, कर्मचारी आणि सखी मंचच्या पुण्यातील बहुतांश सदस्य उपस्थित होत्या.
सावंत म्हणाल्या, आजही राष्ट्रगीताची धून माझ्या कानावर पडतातच माझे डोळे पाणवले जातात कारण ज्या-ज्या वेळी मी आंतरराष्ट्रीय पातळीवर सुवर्णपदक मिळवले त्यावेळी मैदानात भारताचे राष्ट्रगीत वाजवले गेले आणि भारताच्या राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ तिथे उपस्थित असलेले इतर सर्व देशाचे खेळाडू नागरिक उठून उभे रहातात. या मोठ्या सन्मानाचा आपण महत्त्वाचा भाग असतो ही गोष्ट खूप अभिमानास्पद असते.सध्या भारतीय खेळाडूंना खूप चांगले दिवस आलेले आहेत. त्यांना अनेक संधी उपलब्ध होत आहेत. शासकीय पातळीवरसुद्धा खेळाडूंना प्रोत्साहन बरोबर उत्तम आर्थिक तरतूद पुरवली जात आहे. त्यामुळे भविष्यात भारत ऑलिंपिकमध्ये उत्तम कामगिरी करेल.
प्रारंभी सुरक्षा रक्षकाच्या प्लाटूनने तेजस्विनी यांना मानवंदना दिली, त्यानंतर राष्ट्रीय सलामी देत ध्वजवंदन झाले. सूत्रसंचालन ओंकार दीक्षित यांनी केले.