नीरा (पुणे) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पुणे जिल्ह्यातील नीरा-शिवतक्रार गावातील युवकांनी एकत्र येत ३२१ फुट तिरंगा रॅलीचे आयोजन केले होते. नीरा शिवतक्रार ग्राम सचिवालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रगीत, भारत माता की जय, वंदे मातरम, जय जवान जय किसान, इंकलाब जिंदाबाद अशा घोषणा देत सुरु झालेली रॅली अहिल्याबाई होळकर चौक, बुवासाहेब चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पंढरपूर पालखी मार्गावरुन पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौकात समारोप झाला.
नीरा ग्रामपंचायतीच्या कार्यालयाचे ध्वजारोहण सरपंच तेजश्री काकडे यांच्या हस्ते झाले. सौ. लिलावती रिखवलाल शहा कन्या शाळेचे ध्वजारोहण डॉ. नम्रता दगडे यांच्या हस्ते, महात्मा गांधी विद्यालयाचे ध्वजारोहण डॉ. मंदार दगडे यांच्या हस्ते, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे ध्वजारोहण गणेश तातुस्कर व अमोल साबळे यांच्या हस्ते करण्यात आले.
अमृतमहोत्सव आयोजन कमिटी नीरा यांच्या वतीने ३२१ फुटांच्या तिरंग्याची रॅली काढण्यात आली. शालेय विद्यार्थी, व्यावसायिक, महिला बचत व ग्रामपंचायत प्रशासनाच्या पदाधिकारी व सेवक वर्ग, सर्व शाळांचे शिक्षकांनी उतस्फूर्तपणे रॅलीत सहभाग घेतला होता.
शालेय विद्यार्थ्यांनी ३२१ फुटांच्या तिरंग धरला होता. त्यामागे हलगी पथक, भारतीय पोषाख घातलेली ट्रॉली, त्यामागे हिरवा, पांढरा व केसरी रंगांचे पोषाख केलेले ग्रामस्थ, त्यानंतर ट्रॉलिवर विविध धर्मांचे पोषाख घातलेले विद्यार्थी, सर्वसामान्य नागरिक, नीरेतील रिक्षा संघटनेच्या रिक्षा व शेवट मराठी पोषाख घातलेले विद्यार्थी रॅली मध्ये सहभागी झाले होते.
या रॅलीमध्ये भारत माता की जय, वंदे मातरम, जय जवान जय किसान, इंकलाब जिंदाबाद अशा घोषणा देण्यात आल्या. नीरेच्या बाजारपेठेत लोकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. यावेळी ग्रामस्थांनी रॅलीचे उतस्फूर्तपणे स्वागत करत देशभक्तीच्या घोषणा दिल्या.