पुणे : स्वातंत्र्यदिनानिमित्त राज्यातील पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याच्या सूचना राज्याच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने दिल्या आहेत. यामध्ये वृक्षारोपण, अंतर शालेय/अंतर महाविद्यालय यांच्या स्तरावर ऑनलाइन पद्धतीद्वारे वाद विवाद स्पर्धा, प्रश्न मंजुषा/देशभक्तिपर निबंध व कविता, चित्रकला स्पर्धा, देशभक्तिपर गीतगायन, वक्तृत्व स्पर्धा, स्वातंत्र्य संग्रामाच्या दुर्मीळ छायाचित्रांचे संकलन अशा विविध उपक्रमांचे ऑनलाइन आणि ऑफलाइन स्वरूपात आयोजन करण्याच्या सूचना केल्या आहेत.
इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व, एकपात्री अभिनय (वेशभूषासह), राष्ट्रगाण (वेशभूषासह) आणि चित्रकला, तर इयत्ता सहावी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध लेखन, वक्तृत्व, स्वरचित कविता लेखन, काव्यवाचन, देशभक्तिपर गीतगायन, तसेच नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध लेखन, वक्तृत्व, व्हिडिओनिर्मिती, दुर्मीळ छायाचित्रांचा संग्रह, कथाकथन, रांगोळी आदी कार्यक्रम घेण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाने केल्या आहेत.