पाषाण : रामनदीच्या पुनरुज्जीवनासाठी स्वतंत्र प्राधिकरण करुन, त्याला निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली. रामनदीच्या पुनरुज्जीवना संदर्भात पाटील यांनी आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
रामनदीच्या पुनरुज्जीवनासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेतील प्रतिनिधीला प्राधिकरणावर निमंत्रित सदस्य करावे अशी सूचना ही त्यांनी यावेळी केली. यावेळी महापौर मुरलीधर अण्णा मोहोळ, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर, पुणे शहर भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर,बांधकाम अधीक्षक अभियंता युवराज देशमुख, पुनित जोशी उपस्थित होते. यावेळी रामनदीचा स्वतंत्र विकास आराखडा तयार करणे आणि प्राधिकरणात स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधीला निमंत्रित सदस्य करण्याच्या मागणीला आयुक्त विक्रम कुमार यांनी तात्काळ मान्यता दिली.
आयुक्त विक्रमकुमार म्हणाले, रामनदीच्या पुनरुज्जीवनासोबतच मुळा-मुठा नदीचा विकास करण्यात येणार असून,यामध्ये मुळा-मुठा नदीचे सुशोभीकरण, खोलीकरण आणि विकासासाठी स्वतंत्र १७०० कोटीचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याच्यासाठी स्वतंत्र कंपनी स्थापन करण्यात आली असून महापौर त्याचे अध्यक्ष आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले.
रामनदी पुनर्जीवनासाठी काम करणाऱ्या विविध स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी देखील यावेळी उपस्थित होते. यात प्रामुख्याने वीरेंद्र चित्राव,अनिल गायकवाड,शैलजा देशपांडे, विनोद बोधनकर,डॉ. सचिन पुणेकर, सुवर्णा भांबूरकर,नयनीश देशपांडे,ज्योती पानसे, निनाद पाटील,वैशाली पाटकर, जयप्रकाश पराडकर,तुषार सरोदे यांचा समावेश आहे.