पुणे : महापालिकेच्या हद्दीपासून पुढे पाच किलोमीटरच्या अंतरावरील २१ गावांना केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करण्यात येणार आहे. महापालिकेकडून यातील काही गावांमध्ये शुद्ध केलेले पाणी, तर काही गावांमध्ये रॉ वॉटर (शुद्ध न केलेले पाणी) पुरविले जाते. मात्र, त्यासाठी दर समान स्वरूपात आकारला जातो. त्यामुळे काही ग्रामपंचायतींनी गेल्या दहा वर्षांपासून महापालिकेस या पाण्यासाठीचे बिल देण्यात आलेले नाही. त्यामुळे महापालिकेने मागील आठवडयात काही ग्रामपंचायतींचे पाणी तोडले होते. यावरून निर्माण झालेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी हे धोरण ठरविण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.राज्यशासनाच्या आदेशानुसार, पालिका हद्दीजवळच्या २१ गावांची गेल्या काही वर्षांची तब्बल ४५ कोटींची पाणी बिले थकलेली आहे. त्यातील नऱ्हे, किरकटवाडी, खडकवासला, नांदेड आणि नांदोशी या ग्रामपंचायतींची ११ कोटी ३४ लाखांची थकबाकी आहे. या ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा महापालिकेने शनिवारी (दि. २) तोडला होता. मात्र, स्थानिक आमदार तसेच राज्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केल्याने पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे. मात्र, या प्रकारानंतर पालिकेने आकारलेली बिले योग्य दराने नसल्याचा आरोप ग्रामपंचायतींनी केला असून, त्यासाठी पालिकेने स्वतंत्र धोरण करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार, हे धोरण ठरविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
हद्दीलगतच्या गावांसाठी स्वतंत्र धोरण
By admin | Published: May 09, 2015 3:33 AM