पुणे : गेले चार ते पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या एस.टी.च्या संपामुळे इयत्ता बारावीचा निकाल उशिरा लागेल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु, उत्तरपत्रिकांच्या वितरणासाठी पोस्टाने यंदा स्वत:च्या वाहतूक यंत्रणेचा वापर केला आहे. त्यामुळे बारावीचा निकाल वेळेतच प्रसिद्ध होईल. निकालावर एस.टी.च्या संपाचा कोणताही परिणाम होणार नाही, असे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहावी-बारावीच्या परीक्षा घेतल्या जात आहेत. परीक्षा झाल्यानंतर तत्काळ उत्तरपत्रिका संबंधित शिक्षकांकडे तपासणीसाठी पाठविल्या जातात. त्यासाठी उत्तरपत्रिकांचे गठ्ठे पोस्टाकडे जमा केले जातात. यापूर्वी उत्तरपत्रिकांचे गठ्ठे शिक्षकांकडे पाठविण्यासाठी एस.टी.चा वापर केला जात होता. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून एस.टी.चा संप आहे. त्यामुळे एस.टी.वर अवलंबून न राहता पोस्ट ऑफिसने स्वत:च्या वाहनांचा वापर करून शिक्षकांकडे उत्तरपत्रिका तपासण्यासाठी पाठविण्यात आल्या आहेत.
उत्तरपत्रिका कशा पाठविल्या जातात ?
उत्तरपत्रिका पोस्टाकडून दिलेल्या पत्त्यावर विना विलंब पाठविल्या जातात. शिक्षक व मॉडरेटर यांना मोटारीच्या साहाय्याने विभागीय मंडळाकडे उत्तरपत्रिकांचे गठ्ठे पोहोचविता येतात. त्याचा खर्चही राज्य मंडळाकडून दिला जातो.
''उत्तरपत्रिकांचे गठ्ठे एस.टी.ने पाठविले जात नाहीत. पोस्टाची स्वतंत्र वाहतूक यंत्रणा त्यासाठी काम करीत आहेत. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासणीत कोणत्याही अडचणी येत नाहीत. शिक्षक व मॉडरेटर वेळेत काम पूर्ण करीत आहेत. त्यामुळे निकाल वेळेत जाहीर होण्यास कोणतीही अडचण नाही.''- महेंद्र गणपुले, प्रवक्ता, मुख्याध्यापक संघ
''पोस्ट विभागाच्या लाल रंगाच्या वाहनांमधून बोर्डाच्या उत्तरपत्रिकांची वाहतूक केली जात आहे. एस.टी.चा संप असल्याने पोस्ट कार्यालयाने स्वत:च्या वाहनांमधूनच ही वाहतूक सुरू ठेवली आहे. त्यामुळे यंदा उत्तरपत्रिका वितरणासाठी एस.टी.वर अवलंबून राहावे लागले नाही.'' -आय. डी. पाटील, सहायक पोस्ट मास्तर, पुणे