पुणे : महापालिकेच्या कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयातील हत्तींना पोहण्यासाठी स्वतंत्र स्विमिंग पूल (तलाव) बांधण्याचा प्रस्ताव नुकत्यात झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर झाला असून, यासाठी तब्बल ३० लाख ५९ हजार रुपयांची तरतूददेखील करण्यात आली आहे. यामुळे कात्रज उद्यानातील हत्तींचा यंदाचा उन्हाळा गारव्यात जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.गेल्या काही वर्षांत पुण्यातदेखील एप्रिल-मेमध्ये उन्हाचा पारा चाळीशी ओलांडू लागला आहे. या वाढत्या उन्हाचा कात्रज येथील प्राणी संग्रहालयातील प्राण्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो. प्राण्यांना उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी दर उन्हाळ््यामध्ये विविध उपाययोजना राबविण्यात येतात. सध्या राजीव गांधी प्राणीसंग्रहालयात सुमारे ६७ प्रकारचे जवळपास ४०० हून अधिक प्राणी आहेत. या सर्व प्राण्यांचं उन्हापासूून संरक्षण व्हावं, यासाठी कुलर, वॉटर फोगर्स, पाण्याचे हौद अशी वेगवेगळ््या स्वरुपाची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु सध्या येथे हत्तींसाठी कोणत्याही स्वरुपाची मुक्त सोय नाही. कात्रज उद्यानात जानकी आणि नीरा नावाच्या दोन मादी हत्ती आहेत. त्यांच्यासाठी येथे खंदकाची सुविधा आहे, पण नैसर्गिक अधिवासाप्रमाणेच आंघोळीसाठी, डुंबण्यासाठी कोणतीही सुविधा नाही. त्यामुळे या हत्तींना साखळदंडाने बांधून आंघोळ घालावी लागते.कात्रज उद्यानातील हत्तीच्या आंघोळीसाठी स्वतंत्र सुविधा करण्याची मागणी अनेक प्राणीप्रेमींकडून करण्यात आली होती. त्यानुसार कात्रज उद्यानामध्येच हत्तींसाठी स्वतंत्र स्विमिंग पूल बांधण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला आहे. हा प्रस्ताव नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला असून,यासाठी ३० लाख ५९ हजार रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
कात्रज उद्यानामध्ये हत्तींसाठी स्वतंत्र स्विमिंग पूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 3:46 AM