शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्टतर्फे ५० तृतीयपंथी व देवदासींना धान्य किटची मदत देण्यात आली. या वेळी क्रिएटिव्ह चेनच्या कनन पटेल, सिनेदिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, डॉ. ज्ञानराज भुजबळ, अॅड. शिवराज कदम जहागीरदार, विश्वास भोर, सामाजिक कार्यकर्ते महेंद्र पवार, हनुमंत शिंदे, राजेंद्र देशमुख, आनंद सराफ, शिरीष मोहिते आदी उपस्थित होते. डॉ. ज्ञानराज भुजबळ यांनी धान्य किट उपक्रमाकरिता विशेष सहकार्य केले. लॉकडाऊन काळात बाहेरगावच्या विद्यार्थ्यांकरिता आधीपासूनच भोजनसेवा ट्रस्टतर्फे सुरु आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना भोजन वाटप महापौरांच्या हस्ते झाले.
मोहोळ म्हणाले, ''पुण्याला गणेशोत्सव आणि गणेशोत्सव मंडळांची मोठी परंपरा आहे. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या उत्सवाचा उद्देश मंडळे आणि कार्यकर्त्यांनी आजही जपला आहे. संकटाच्या काळात नेहमीच गणेशोत्सव मंडळे मदतीकरिता उभी राहिली आहेत. सेवा मित्र मंडळांनीदेखील कोविडच्या काळात केलेले काम कौतुकास्पद आहे.
मंडळाचे अध्यक्ष रवींद्र बरिदे म्हणाले, तृतीयपंथींना मदत देण्यासोबतच कोविडच्या दुसऱ्या लाटेतील लॉकडाऊनच्या सुरुवातीपासून विद्यार्थी भोजनसेवा सुरु केली. आजमितीस सुमारे १३५ विद्यार्थी नियमितपणे दररोज भोजन घेऊन जात आहेत. ही संख्या वाढत असून मंडळातर्फे उत्तम भोजन देण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच समाजातील विविध गरजू घटकांना देखील मदत देणार असल्याचे त्यांनी सांगितले. मंडळाचे वैभव वाघ, अमर लांडे, विक्रांत मोहिते, कालिदास पंडित, सचिन ससाणे, उमेश कांबळे, देविदास चव्हाण, पराग शिंदे, राजेंद्र कांचन आदींनी आयोजनात सहभाग घेतला.