पुणे: कॉंग्रेस पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. काँग्रेस पक्षाला एक विचार आहे. ही व्यक्ती विशेष पार्टी नाही असे सांगतानाच ‘केंद्र आणि राज्यातील सत्तेतून भाजपला बाहेर काढणे, हा एकमेव उद्देश इंडिया आघाडीचा आहे. त्यामुळे तिकीट वाटप आणि जागा वाटप करताना मेरीट हा एकमेव निकष राहणार आहे,’’ असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. राज्यातील सरकारच्या कथनी व करणी मध्ये फरक आहे. हे सरकार सेल्फीश सरकार आहे, स्वतःच्या फायद्यासाठी काम करत आहे अशी टिकाही पटोले यांनी केली.
प्रदेश कॉंग्रेसच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभा मतदार संघातील आढावा बैठकीसाठी पटोले पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणीती शिंदे, विश्वजित कदम, संजय जगताप, संग्राम थोपटे, महिला प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे, शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. केंद्रातील आणि राज्यातील महायुतीच्या सरकारवर पटोले यांनी जोरदार टीका केली.
नाना पटोले म्हणाले, पुणे लोकसभा मतदार संघातील परिस्थिती आता बदलली आहे. आजची परिस्थिती काय आहे, याचा विचार करून निर्णय घेण्यात येईल. वाढती बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, गरिबांवर होत असलेला अन्यायामुळे जनतेचा कौल भाजपच्या विरोधात आहे. हे कसबा निवडणुकीत दाखवून दिले, असे पटोले यांनी सांगितले.
ठोस प्रस्ताव येत नाही, तोपर्यंत निर्णय घेता येणार नाही
वंचित बहुजन विकास आघाडीला इंडिया आघाडीमध्ये सहभागी करून घेण्याबाबत पटोले म्हणाले,‘‘ त्यांच्याकडून कोणताही ठोस प्रस्ताव येत नाही, तोपर्यंत निर्णय घेता येणार नाही. परंतु सध्याची राजकीय परिस्थिती विचारात घेतली लोकशाही आणि संविधान धोक्यात आहे. याचा विचार करून कोणत्या गोष्टीचा आग्रह धरला पाहिजे, याचा विचार सर्वांनीच केला पाहिजे.’’ जातीनिहाय जनगणनासंदर्भात केंद्र सरकारनेच पुढाकर घेऊन ती केली पाहिजे. तरच महिला आरक्षण लागू होऊ शकते. राज्य सरकारने करणे गैर नाही.. यापूर्वीच जातीनिहाय जनगणनेचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे पाठवला आहे. परंतु त्यांनी मंजूर केला नाही. आम्ही सत्तेत आलो तर पहिले काम ते करू,’’असेही एका प्रश्नाला उत्तर देताना कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.
भाजपला सत्तेबाहेर काढणे, हा एकमेव उद्देश
राज्यातील सरकारच्या कथनी व करणी मध्ये फरक आहे. हे सरकार सेल्फीश सरकार आहे, स्वतःच्या फायद्यासाठी काम करत आहे. हे असविधानिक सरकार असून त्यावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. नांदेड, नागपूर, संभाजीनगर येथे रुग्णालयात मृत्यूचे तांडव सुरू आहे. परंतु दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा डोळा मुख्यमंत्री खुर्चीवर आहे. हे जनतेसमोर जाऊन मांडणे आणि संघटनात्मक बांधणी मजबूत करून भाजपला सत्तेबाहेर काढणे, हा एकमेव उद्देश आहे असे कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.
धंगेकर यांच्या गैरहजेरीवर उत्तर देणे टाळले
काँग्रेसच्या बैठकीच्या स्थळी पुणे ग्रामीणमधील आमदार संग्राम थोपटे, संजय जगताप यांचे फोटो बॅनर्सवर लावले आहे. मात्र कसबा पोटनिवडणुकीत विजयी झालेले आमदार रविंद्र धंगेकर यांचा फोटो बॅनर्सवर नाही. ते गैरहजर आहे याबाबत पत्रकारांनी विचारले असता कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी धंगेकर यांच्या गैरहजेरीवर उत्तर देणे टाळले.