लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : चार महिने होऊनही दिल्लीतील शेतकरी आंदोलनाकडे सरकार लक्ष देत नाही याचा निषेध म्हणून स्वयंसेवी संस्था संघटनांनी २६ मार्चला भारत बंदची हाक दिली आहे. राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना हे पक्षही यात सहभागी होणार आहेत. याबरोबरच २८ मार्चला होळीच्या दिवशी नव्या कायद्याची होळी करणार आहे.
आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी स्थापन करणाऱ्या जन आंदोलनाच्या संघर्ष समितीचे पदाधिकारी उल्का महाजन, विश्वास उटगी यांनी ही माहिती दिली. संजीव साने यांनी या ऑनलाईन पत्रकार परिषदेचे संयोजन केले. महाजन व उटगी यांनी या वेळी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली.
ज्यांच्यासाठी कायदा केला असे केंद्र सरकार सांगत आहे ते शेतकरीच त्याला विरोध करत आहेत. कोणालाही विश्वासात न घेता देशातील शेती ही कंपन्यांच्या घशात घालण्याचा हा प्रयत्न आहे. कामगार संघटनांना काहीही न कळवता त्यांच्यासाठी असलेले ४४ कायदे बदलून ४ नवे, त्यांचे अहित करणारे कायदे अमलात आणले जात आहेत. या सर्वांचा विरोध म्हणून भारत बंदची हाक दिली आहे, असे उटगी व महाजन म्हणाले.
यात ११० संघटना सहभागी होत आहेत. भाजपा वगळता सर्व राजकीय पक्षांनी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. रस्ता किंवा रेल्वेसह कोणतेही वाहन यात बंद केले जाणार नाही. फक्त दिवसभर काम बंद राहील. राज्यातील ३६ जिल्हे, ४०० तहसील कार्यालयांमध्ये निवेदन दिले जाईल. याबरोबरच २८ मार्चला सर्व कार्यकर्ते एकत्र जमून सरकारने बदल केलेल्या कायद्याच्या प्रतींची होळी करतील, अशी माहिती उटगी व महाजन यांनी दिली.