पुणे : पाकिस्तानी लष्करी सैनिकांनी बांगलादेशातील नागरिकांवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार केले. १९७१ जो लढा दिला त्यामध्ये भारतीय लष्कराने महत्त्वाची भूमिका बजावली होती. भारताला शेजारील देशांसोबत चांगले संबंध ठेवणे गरजेचे आहे. भारताचे बांगलादेशासोबत सामाजिक, आर्थिक, व्यापारी संबंध घट्ट होणे गरजेचे आहे, असे मत निवृत्त लेफ्टनंट कर्नल काझी सज्जाद अली झहीर यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि सेंटर फॉर ऍडव्हान्स स्ट्रॅटेजिक स्टडीज (कॅस) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यानात निवृत्त लेफ्टनंट कर्नल अली झहीर ‘द हिस्ट्री अनफोल्डिंग’ या विषयावर ऑनलाईन बोलत होते. या वेळी अध्यक्षस्थानी निवृत्त लेफ्टनंट जनरल एस. एस. मेहता होते. बांगलादेशाचे मुंबईतील उप-उच्च्यायुक्त मोहम्मद लुत्फुर रहमान, शहाबुद्दीन अहमद ऑनलाईन उपस्थित होते. भारतीय लष्कराने १६ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानवर मिळविलेल्या विजयाचे ५० वे वर्ष आहे.
रहमान म्हणाले की, भारत आणि बांगलादेशाचे संबंध नेहमी शांततापूर्ण राहिले आहेत. १९४७ तसेच १९७१ च्या इतिहासापासून मैत्रीपूर्ण संबंध राहिलेले आहेत. बांगलादेशाला पायाभूत सुविधा, शाश्वत विकासकामांसाठी आर्थिक मदत केली आहे. ऊर्जा आणि इतर क्षेत्रात भारताच्या कंपन्या काम करतात. २०१९ मध्ये या दोन देशांच्या राष्ट्रपतींमध्ये विकासाठी व्यापार, ऊर्जा, रोजगार आदी सामंजस्य करार झाले आहेत.
भारतात बांगला पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. गेल्या एक वर्षांपासून कोरोनाकाळात भारताची मोठी मदत बांगलादेशाला होत आहे. दोन्ही देशांच्या प्रमुख नेत्यांच्या दूरदृष्टीमुळे मैत्रीपूर्ण संबंध घट्ट राहिलेले आहेत. यापुढील काळातही कायमचे मैत्रीपूर्ण संबंध राहण्याची गरज आहे, अशी आशा रहमान यांनी व्यक्त केली.