पुणे : भारत हा ‘बिनडोकं’ लोकांचा देश आहे. लोकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरचं नव्हे तर संविधानही कळलेले नाही. त्यांनी दिलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्यही उमजलेले नाही. नथुराम गोडसे नाटक यायला हवं. मोदींवरचा चित्रपट आणि ‘अँक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’सारखे चित्रपट देखील यायला हवेत. समाजाचं डोकं ठिकाणावर असेल तर काय चांगलं काय वाईट हे समजेल. त्यामुळे चित्रपटांवरची ‘सेन्सॉरशीप’ ही बंद झाली पाहिजे, असे परखड मत मानव अधिकार विश्लेषक अॅड. असीम सरोदे यांनी व्यक्त केले. मुक्तांगण फाऊंडेशनच्या दुस-या वर्धापनदिनानिमित्त आयोजित प्रेरणा पुरस्कार सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष नारायण कांबळे, उपाध्यक्ष व अभिनेते विजय पाटकर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.सरोदे म्हणाले, पूर्वी संवेदनशील विषयांमधून समाजामध्ये जनजागृती केली जात होती. त्यासाठी चित्रपट हे प्रभावी माध्यमं होतं. मात्र आज चित्रपटांमधून प्रतिकात्मकता बदलण्यावर भर दिला जात आहे. चित्रपटांमध्ये शिवी वगैरे चालत नाही. समाजातील भाषा चित्रपटांमध्ये वापरण्यावर आक्षेप घेतला जातो. सेन्सॉर बोर्डाच्या नावाखाली चित्रपट दडपले जात आहेत. घटनाबाहय सत्ताकेंद्र निर्माण होत आहेत. त्यावर गांभीर्याने विचार करायला हवा. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे मुक्त असायला हवं. 2014 च्या निवडणूकीत वाईट संदेश, चित्र दिसले हे कुणी सुरू केले हे सर्वांना माहिती आहे. आता इतर कुणी या गोष्टी केल्या तर कारवाई का होते? आपल्या जबाबदारीचे भान ठेवून वागत असलेला समाज विकसनशील असतो. मानवी प्रतिष्ठेसह सगळ्यांना जीवन जगण्याचा अधिकार आहे. नथुराम गोडसे यावर नाटक येत असलं तर ते यायला हवं. अशा गोष्टींमुळे गोडसे महान होत नाहीत.
भारत ‘ बिनडोक’ लोकांचा देश आहे : अॅड. असीम सरोदे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 9:21 PM