पुणे : जगाने आज आपल्याला एक मोठी संधी दिली. चीनकडे संशयाने पाहिले जात असताना भारत एक मोठी उत्पादक बाजारपेठ म्हणून उदयाला येत आहे. ही जी वेळ आज भारताला मिळाली आहे त्याचा आता सदुपयोग करायला पाहिजे. असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.
भारती विद्यापीठाच्या भारती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि स्टुडंटस हौसिंग कॉम्प्लेक्सचे उद्घाटन शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखु यांच्या उपस्थितीत झाले. भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती डॉ. पतंगराव कदम यांच्या जयंती निमित्ताने पहिला डॉ. पतंगराव कदम स्मृती पुरस्कार सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांना प्रदान करण्यात आला त्यावेळी पवार बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, विद्यापीठाचे कार्यवाह आणि प्र कुलगुरू आ. डॉ. विश्वजीत कदम, कुलगुरू डॉ. विवेक सावजी, आरोग्य विज्ञान विभागाच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप ,हिमाचलचे कॅबिनेट मंत्री संजय अवस्थी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, पतंगराव कदम जिंदादील होते. प्रेम आणि जिव्हाळा निर्माण करण्याची ताकद त्यांच्यात होती. शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद त्यांच्यात होती. ते आपल्यात नाहीत यावर आजही विश्वास बसत नाही.आदर पुनवाला आणि त्यांच्या टीमने जे काम केले ते त्यामुळे भारत काय आहे हे त्यांनी जगाला दाखवून दिले. त्यांच्या या कार्याचा, सिरम इन्स्टिट्यूटचा आदर वाटतो. पतंगराव कदम यांच्या नावाने असलेला पहिला पुरस्कार आदर पुनवाला यांना दिला ते अतिशय समर्पक आहे.
भारती विद्यापीठ संस्थेने आता आपला मोर्चा विदर्भातही वळवावा
देशात आपण उच्चशिक्षणाचा मोठा विस्तार केला. अनेक खासगी संस्थानी त्यात बहुमूल्य योगदान दिले. सुरवातीला या खासगीकरणबद्दल लोकांच्या मनात शंका होती. मात्र भारती विद्यापीठ सारख्या संस्थांनी एक मिशन म्हणून हे काम हाती घेतले आणि ते पूर्णत्वास नेले. आपल्या शिक्षण क्षेत्रांत आपण ज्याप्रकारे पुढे जातो ते पाहता एक मोठा बदल पाहण्यास मिळत आहे. उच्च शिक्षणातून यात मोठा बदल होऊ शकतो. भारती विद्यापीठ संस्था शिक्षण क्षेत्रात मोठा नावलौकिक मिळवू शकतो. भारती विद्यापीठ संस्थेने आता आपला मोर्चा विदर्भातही वळवावा. आता समृद्धी महामार्गही झाला असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.