लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : आम्ही केवळ सरकार बनवण्यासाठी नाही, तर देश घडवण्यासाठी राजकारण करतो. रशिया-युक्रेन युद्धामुळे जगभर महागाई वाढली आहे. मात्र, सद्य:स्थितीत अमेरिकेपेक्षा भारतात कमी महागाई आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना महामारीतही देशाची अर्थव्यवस्था बिघडू दिली नाही. त्यामुळे जगात भारताची अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करत आहे, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी येथे केले.
विश्रांतवाडी येथे भारतीय जनता पार्टीच्या ‘पदाधिकारी संवाद’ कार्यक्रमात शुक्रवारी राजनाथ सिंह बोलत होते. याप्रसंगी खासदार गिरीश बापट, पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे, माजी आमदार दिलीप कांबळे, बापूसाहेब पठारे, गणेश बीडकर, हेमंत रासने यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
...अन् पुतीन यांनी बाॅम्बफेक बंद केली
रशियाकडून युक्रेनवर बाॅम्बफेक सुरू होती. त्या वेळी युक्रेन येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी अडथळे येत होते. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना सांगून बाॅम्बफेक बंद करायला लावली, असे राजनाथ म्हणाले. पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात राजनाथ सिंह सहभागी झाले होते.