पुणे : भारतीय तरुणांमध्ये बुद्धिमता ठासून भरली आहे. परंतु, पोषक वातावरणाअभावी आपण मागे पडतो. सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शिक्षण आदी क्षेत्रांतील प्रश्न सोडविण्यासाठी स्वस्त आणि दर्जेदार इनोव्हेशनची आज जगाला गरज असून, भारतीयांकडे ती क्षमता आहे. तरुणांतील गुणवत्तेला आणि नवकल्पनांना वाव मिळाल्यास येत्या काळात अशा प्रकारची अफलातून संशोधने आपले जीवन अधिक सुसह्य करतील, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले.लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३ डी २ च्या पुढाकारातून स्थापलेल्या ‘लायन्स फोरम फॉर इनोव्हेशन’च्या वतीने शाहीर अण्णा भाऊ साठे सभागृहात आयोजित इनोव्हिजन-२०१७ या विशेष सेमिनारच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. माशेलकर बोलत होते. विचारवंत संदीप वासलेकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अमिताभ मलिक, ज्येष्ठ उद्योजक प्रतापराव पवार, डॉ. सतीश देसाई, लायन्स क्लब इंटरनॅशनलचे जिल्हा प्रांतपाल चंद्रहास शेट्टी, फोरमचे अध्यक्ष रमेश शहा, समन्वयक हेमंत नाईक, आनंद आंबेकर, शरद पवार, अशोक मिस्त्री, दिनकर शिलेदार उपस्थित होते.डॉ. माशेलकर म्हणाले, ‘‘तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे. आयटी, मोबाईल क्रांतीमुळे दहा वर्षांपूर्वी माहिती नसलेल्या अनेक गोष्टींना आज आपण सरावलो आहोत. दर्जेदार आणि स्वस्त साधनांच्या निर्मितीमुळे समाजात काहीशी समानता येऊ शकेल. पालक, शिक्षकांनी मुलांना लहानपणापासूनच मुक्तपणे विचार करण्याची आणि त्यांच्यातील उत्सुकता वाढवत ठेवण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवे. कॅन्सर, हिमोग्लोबीन, ईसीजी तपासणी पाच-दहा रुपयांत उपलब्ध करून देण्याची किमया भारतातील तरुणांनी केली आहे, ही आपल्यासाठी गौरवाची बाब आहे.’’रमेश शहा यांनी प्रास्ताविकात फोरमच्या स्थापनेमागील भूमिका विषद केली. आगामी वर्षात इनोव्हेशनवर विविध उपक्रम घेऊन चांगले इनोव्हेटर्स तयार केले जाणार असल्याचे रमेश शहा म्हणाले. डॉ. अमिताभ मलिक व लायन चंद्रहास शेट्टी यांनीही मनोगत व्यक्त केले. हेमंत नाईक यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)
दर्जेदार इनोव्हेशनची भारताकडे आहे क्षमता
By admin | Published: January 09, 2017 3:36 AM