- उमेश जाधव
पुणे : cricket world cup 2023- ढोल ताशांचा गजर, भर पावसात तरुणाईने इंडिया, इंडियाच्या घोषणा देत केलेला जल्लोष, नवोदित खेळाडूंची गर्दी अशा अत्यंत उत्साही वातावरणात पुणेकरांनी मंगळवारी आयसीसी क्रिकेट विश्वचषक ट्राॅफीचे जोरदार स्वागत केले. इतिहासात पहिल्यांदाच रॅलीच्या माध्यमातून पुणेकरांना विश्वचषक ट्राॅफी जवळून अनुभवता आली.
पुणे शहरात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन क्रिकेट स्टेडियम गहुंजे येथे आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे पाच सामने खेळविण्यात येणार आहेत. १९ ऑक्टोबरला पुण्यात विश्वचषक स्पर्धेतील भारत-बांगलादेश हा पहिला सामना रंगणार आहे. त्यानंतर चार सामने याच मैदानावर खेळवण्यात येतील. त्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ यांच्या मान्यतेने महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने पुणेकरांना ही ट्राॅफी पाहता यावी यासाठी जेडब्ल्यू मेरिएट हाॅटेल ते कृषि महाविद्यालय अशी या ट्राॅफीची मिरवणूक काढण्यात आली.महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहित पवार म्हणाले की, यंदाची विश्वचषक स्पर्धेतील पाच सामने पुण्यात होत आहेत. त्यामुळे पुढील एक ते दीड महिना सगळीकडे क्रिकेटमय वातावरण असणार आहे. या स्पर्धेत सर्वसामान्य पुणेकरांना सामावून घेण्यासाठी विश्वचषक रॅलीचे आयोजन करण्यात आले. आयसीसी-बीसीसीआयकडे आग्रह केल्यानंतर पुण्याला विश्वचषकाच्या ट्राॅफीची रॅली काढण्यास परवानगी मिळाली. प्रत्येक पुणेकराला विश्वचषक पाहता यावा, त्यासोबत छायाचित्र घेता यावे हा या रॅलीचा उद्देश होता.
मंगळवारी सिम्बायोसिस महाविद्यालय, बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय, मराठवाडा मित्रमंडळ वाणिज्य महाविद्यालय, फर्ग्युसन महाविद्यालय अशी विश्वचषक ट्राॅफीची रॅली काढण्यात आली. यावेळी महाविद्यालयीन तरुणाई रस्त्यावर उतरल्यामुळे प्रचंड उत्साही वातावरण होते. नवोदित क्रिकेटपटू दुपारी बारा वाजल्यापासून रस्त्यावर होते. फर्ग्युसन महाविद्यालयाजवळ प्रचंड पाऊस असतानाही तरुणाईने पावसात ट्राॅफीचे स्वागत केले.