लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “आजच्या काळात ‘ग्लोबल इंडिया’ ही संकल्पना नाकारली जात आहे. एकता, बंधुता, एक देश एक राष्ट्र या सर्वांचाच अर्थ विसरून अधिकाधिक वास्तविकतेवर आपण लक्ष्य केंद्रित करीत चाललो आहोत. या संकल्पनांच्या व्यापकतेचा विचार न करता आपल्या मुळाचा शोध घेत संकुचित विचासरणीकडे झुकत आहोत. यातून आपण किती सहिष्णू आहोत असे जरी भासवले जात असले तरी प्रत्यक्षात देश असहिष्णू झाला आहे. सध्या देशात जे काही सुरू आहे ते न पटणारे आहे,” असे मत ज्येष्ठ दिग्दर्शिका आणि लेखिका सई परांजपे यांनी व्यक्त केले.
सई परांजपे यांचे ‘सय’ हे मराठीतील आत्मचरित्र ‘अ पँचवर्क क्विल्ट: अ कोलाज ऑफ माय क्रिएटिव्ह लाईफ’ या नावाने इंग्रजी वाचकांसाठी उपलब्ध झाले आहे. पुणे इंटरनँशनल सेंटर (पीआयसी) च्या वतीने या पुस्तकावर ऑनलाईन संवादाचे आयोजन केले होते. लतिका पाडगावकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि ‘पीआयसी’चे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. खासदार कुमार केतकर, उपेंद्र दीक्षित, डॉ. विद्या केळकर आदी यावेळी उपस्थित होते.
सई परांजपे यांचे वडील रशियन आणि आई शकुंतला मराठी. धर्मनिरपेक्षता, स्वतंत्र विचारसरणी अशा सर्वार्थानेच या कुटुंबाला एक ‘ग्लोबल’ ओळख मिळाली. ‘ग्लोबल इंडिया’ ही संकल्पना खऱ्या अर्थाने जगलेल्या एका कुटुंबाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सई परांजपे यांना ‘ग्लोबल इंडिया’ संकल्पना देशातून नाकारली जात आहे का, असा प्रश्न करण्यात आल्या. त्यावर त्या म्हणाल्या, “दुर्देवाने हो”
“नृत्याचे शिक्षण, वृत्तनिवेदिकेची नोकरी, नाट्य लेखन, दूरदर्शनसाठी बालनाट्यनिर्मिती, चित्रपट दिग्दर्शन अशी सर्वच माध्यमं हाताळल्यामुळे आई नेहमी मला म्हणायची, की तू एकाच गोष्टीवर लक्ष का केंद्रित करत नाहीस? किमान एका विषयात तरी निपुणता येईल. पण ‘एक ना धड भाराभर चिंध्या’. मी आईचं कधीच ऐकलं नाही. आयुष्यात मी एकेक चिंधी जमवत गेले आणि त्यातून आयुष्याचं एक रंगतदार कलात्मक कोलाज तयार केलं. म्हणूनच या पुस्तकाला ’अ पँचवर्क क्विल्ट: अ कोलाज ऑफ माय क्रिएटिव्ह लाईफ’ असे नाव दिले,” असे परांजपे म्हणाल्या.