पुणे : यंदाच्या गाळप हंगामात भारताने साखर उत्पादनात ब्राझीलला मागे टाकत जगात पहिला क्रमांक मिळवला. भारतात महाराष्ट्र अव्वल ठरला असून उत्तर प्रदेश पिछाडीवर गेला आहे. देशात यंदा ३५० लाख टन साखर उत्पादन झाले असून महाराष्ट्राचा त्यातील वाटा ५१ टक्के म्हणजे १३८ लाख टनांचा आहे.
साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी ही माहिती दिली. देशाचे व देशात महाराष्ट्राचे हे साखरेचे विक्रमी उत्पादन आहे. ब्राझीलने त्यांचे साखर उत्पादन इथेनॉलकडे वळवल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखर कमी पडली व ती पोकळी भारताने तसेच महाराष्ट्राने भरून काढली. भारतामधून झालेल्या ९० लाख टन साखरेपैकी ५१ टक्के साखर एकट्या महाराष्ट्राने निर्यात केली आहे. साखरेबरोबरच यंदा इथेनॉल उत्पादनातही राज्यातील साखर क्षेत्राने आघाडी घेतली आहे. २०० कोटी लिटर इथेनॉल तयार करण्याची क्षमता राज्याने प्राप्त केली. त्यापैकी ११२ कोटी लिटर इथेनॉलचे करार साखर कारखान्यांनी वेगवेगळ्या ऑईल कंपन्यांबरोबर केले आहेत.
यंदा १९९ कारखान्यांनी १३२०.३१ लाख टन उसाचे गाळप केले. त्यातून १३८ लाख टन साखर निर्माण झाली. सरासरी ऊस उतारा १०.४० असा होता. २४० दिवस हंगाम झाला. त्यातील सरासरी १७३ दिवस गाळप झाले. सहवीज निर्मितीमधून कारखान्यांना अडीच हजार कोटी रुपये मिळाले. विक्रमी गाळप होऊनही कारखान्यांना इथेनॉलचे, निर्यातीचे, सहवीजनिर्मितीचे पैसे लगेचच मिळत असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही आतापर्यंत एफआरपीचे (उसाची रास्त किफायतशीर किंमत) ९६ टक्के पैसे मिळाले. त्यामुळे आर्थिक स्तरावर कारखाने, शेतकरी अशा दोन्ही घटकांना यंदाचा गाळप हंगाम दिलासा देणारा ठरला, असे गायकवाड यांनी सांगितले.
कठोर निर्णयांमुळे लागली शिस्त
प्रशासनाने काही कठोर निर्णय घेतल्यामुळेही साखर उद्योगात शिस्त आली, असे मत गायकवाड यांनी व्यक्त केले. संपूर्ण एफआरपी दिल्याशिवाय गाळपासाठी परवानगी दिली गेली नाही, एफआरपी देणाऱ्या कारखान्यांचे टक्केनिहाय नावे जाहीर केल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस कुठे टाकायचा याचा निर्णय घेता आला, गुणपत्रकात तळाला गेले की बँकेकडून कर्ज मिळण्यात अडचणी येणार असल्याने कारखान्यांनीही वरच राहण्याचा प्रयत्न केला, असे काही निर्णय उपयोगी ठरले असे ते म्हणाले.