पुणे :चीनमध्ये काेराेना रुग्ण वाढत असले, तरी भारताला काळजी करण्याचे काही कारण नाही. कारण, आपल्याकडे माेठ्या प्रमाणात लसीकरण झाले आहे, असा ट्वीट सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी केले आहे. चीनमध्ये काेराेना रुग्णांचे प्रमाण झपाट्याने वाढत असून, लाॅकडाउनसदृश स्थिती उद्भवली आहे. त्यामुळे भारतासह जगातील इतर देशही धास्तावले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी हे दिलासादायक विधान केले आहे.
दरम्यान, चीनमधील काेराेना उद्रेकाच्या धर्तीवर केंद्रीय आराेग्य विभागाने राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. अशावेळी पूनावाला यांनी आश्वासक ट्वीट केले आहे. काेराेनाची भीती घेण्याची आवश्यकता नसून, केंद्रीय आराेग्य खात्याने घालून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी करायला हवी.