पुणे : रविवार २२ तारखेपासून चित्रपटगृहे खुली होणार आहेत. मात्र, एक-दोन अपवाद सोडले तर गर्दी खेचू शकतील असे चित्रपट प्रदर्शित होत नसले तरी शहरातील मल्टिप्लेक्स रविवारी हाउस फुल होणार आहेत. टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत-पाकिस्तान’चा पहिला सामना रविवारी २४ ऑक्टोबरला होणार असल्याने प्रेक्षकांना हा सामना मोठ्या पडद्यावर पाहाण्याची सोय चित्रपटगृह चालकांनी उपलब्ध करून दिली आहे. विविध ठिकाणच्या मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये हा सामना दाखविण्यात येणार असून, त्यासाठी चारशे ते हजार रूपयांपर्यतचे तिकिट ठेवण्यात आले आहे.
गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे चित्रपटगृह बंदच ठेवण्यात आल्यामुळे चित्रपटगृहात जाऊन सहकुटुंब किंवा मित्रमैत्रिणींसमवेत चित्रपट पाहाण्याच्या आनंदाला प्रेक्षकवर्ग मुकला होता. परंतु आता शुक्रवारीच चित्रपटगृहांचा पडदा उघडणार असल्याने प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सध्या निर्माते किती प्रेक्षक चित्रपटगृहांमध्ये येतील याचा अंदाज घेऊनच नवीन चित्रपट प्रदर्शित करण्याच्या मानसिकतेत आहेत. त्यामुळे चित्रपटगृह खुली झाली तरी नवीन चित्रपट पाहाण्यासाठी प्रेक्षकांना अजून थोडी प्रतीक्षाच करावी लागणार आहे. मात्र, पहिल्या आठवडा रिकामा जाऊ नये यासाठी चित्रपटगृह चालकांनी एक अनोखी क्ल्युप्ती लढवली आहे.
रविवारी होणा-या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारतीय संघाचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध रंगणार आहे. पारपंरिक प्रतिस्पर्धी संघातील हा थरार पाहण्याची संधी चित्रपटगृहांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी तिकिटाचा दरही चारशे ते हजार रुपयांपर्यंत ठेवण्यात आला आहे. आता ही क्लुप्ती यशस्वी होतीये का? प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा मिळतोय हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.