भारताने युक्रेनला मदत करावी, दुतावासाचे सचिव व्होलोडीमीर प्रयतुलांनी व्यक्त केले मत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 11:17 AM2024-02-27T11:17:23+5:302024-02-27T11:18:29+5:30
महाराष्ट्र साहित्य परिषदेतील पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते....
पुणे : भारताची भूमिका वैश्विक आहे. भारत ज्या पद्धतीने शेजारील राष्ट्रांना साहाय्य करतो तसेच त्यांनी युक्रेनला करावे. भारत आणि युक्रेनची लोकशाही मूल्ये सारखी आहेत. ती जपली जायला हवीत, असे मत युक्रेन दूतावासाचे द्वितीय सचिव व्होलोडीमीर प्रयतुला यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेतील पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.
ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख लिखित ‘फ्रीडम ऑन फायर’ या कथासंग्रहाचे प्रकाशन युक्रेन दूतावासाचे द्वितीय सचिव व्होलोडीमीर प्रयतुला आणि चीनमधील माजी भारतीय राजदूत गौतम बंबावाले यांच्या हस्ते नुकतेच झाले. माजी संमेलनाध्यक्ष भारत सासणे, लक्ष्मीकांत देशमुख, समीक्षक महेंद्र कदम, प्रकाशक अखिल मेहता उपस्थित होते.
भारत आणि सोव्हिएत संघात करार झाला होता. बांगलादेशाची निर्मिती होईपर्यंत संघाने मदत केली होती. त्यानंतरही युद्धासंबंधी सामग्रीत रशियाची मदत लाभली आहे. त्यामुळे भारत रशिया-युक्रेन युद्धाला स्वतःच्या धोरणात्मक दृष्टिकोनातून पाहिले जाईल, त्याकडे रोमॅण्टिसिझमने पाहता येणार नाही. तरीही भारताने रशियाच्या युद्धाचे समर्थन केलेले नाही. त्यामुळे भारताचे धोरण हे वास्तववादातून आलेले आहे, असे मत यावेळी माजी राजदूत गौतम बंबावले यांनी व्यक्त केले. भारताला जरी मोठ्या युद्धांची पार्श्वभूमी नसली तरी भारतीय सहिष्णुतेतून निर्माण झालेल्या या मानवतावादी कथा मध्यमवर्गीय माणसाला केंद्रस्थानी ठेवून उभ्या राहतात. मध्यमवर्गीय माणूस अनेक क्रांतीशी जोडला गेलेला आहे, हे स्पष्ट करणाऱ्या या कथा आहेत, त्यामुळे या कथांचे साहित्यिक मूल्यही विचारांचे नेमके बीज मांडते, असे मत यावेळी समीक्षक महेंद्र कदम यांनी व्यक्त केले.
रशिया-युक्रेन युद्धाला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. मुळात हे युद्ध विषम शक्तींचे युद्ध आहे. साम्राज्यवादी वृती अजूनही जगातून नाहीशी झाली नाही. हे एका देशाने दुसऱ्या देशावर लादलेले युद्ध आहे आणि एक वैश्विक नागरिक म्हणून आपण आपली भूमिका मांडली पाहिजे, असे मत लेखक लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले.