पुणे : ‘श्रीलंकेत तेथील सरकारने तुघलकी निर्णय घेतले व तो देश आर्थिक अडचणीत आला. भारतातही तसे काही होऊ नये, कारण तशीच परिस्थिती इथे आहे. काँग्रेस ती सावरण्याचा प्रयत्न करत आहे,’ असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केले.
काँग्रेसच्या वतीने बुधवारी सकाळी छत्रपती संभाजी महाराज उद्यानाच्या समोर आंदोलन करण्यात आले. लोंढे यांच्यासह काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, गोपाळ तिवारी, गटनेते आबा बागुल, ज्येष्ठ नगरसेवक अरविंद शिंदे तसेच पक्षाचे अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. महिला कार्यकर्त्यांनी पदपथावरच चूल मांडून तिथेच प्रतीकात्मक स्वयंपाक सुरू केला. गॅस, पेट्रोल यांच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. सामान्यांचे घर चालवण्याचे सगळे अंदाजपत्रक कोसळून पडले आहे. तरीही केंद्र सरकार महागाईवर नियंत्रण आणायला तयार नाही, अशी टीका यावेळी करण्यात आली.
लोंढे म्हणाले, ‘सरकारने सर्वसामान्यांचा विचार करून निर्णय घेणे अपेक्षित आहे. श्रीलंकेत सरकारने एका रात्री अचानक सर्वांनी सेंद्रिय शेतीच करावी असा निर्णय घेतला. आज देशाचे शेती उत्पादन कमी होऊन तो देश अडचणीत आला आहे. तेथील सत्ताधाऱ्यांना पळून जावे लागले. आपल्याकडेही असेच एका रात्रीत नोटाबंदी, टाळेबंदीसारखे निर्णय घेतले. भारतात असे काही होऊ नये, यासाठी काँग्रेस प्रयत्नशील राहून सरकारला ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न करत आहे.
जनतेला सत्य स्थिती सांगावी म्हणूनच काँग्रेसने रस्त्यावर येऊन आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे, असे लोंढे म्हणाले. आंदोलनात महिला शहराध्यक्ष पूजा आनंद, तसेच पक्षाच्या सर्व आघाड्यांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, सहभागी झाले होते. केंद्र सरकार, भारतीय जनता पार्टीच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. केंद्र सरकारने स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर, पेट्रोल, डिझेल यांचे दर त्वरित कमी करावेत, ते किमान काही वर्षे स्थिर राहतील, याची खात्री द्यावी, अशी मागणी यावेळी पक्षाच्या वतीने करण्यात आली.