- उमेश जाधव
पुणे : नववर्षात पुणेकरांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याची मेजवानी मिळणार आहे. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) गहुंजे येथील क्रिकेट स्टेडियमवर भारत-श्रीलंका यांच्यात ५ जानेवारीला (गुरुवार) आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट सामना होणार आहे. भारत-श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरी लढत पुण्यात होणार आहे. याआधी पुण्यात मार्च २०२१ मध्ये भारत-इंग्लंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामने खेळविण्यात आले होते. पुण्यातील हा दिवस-रात्र सामना असणार आहे.
एमसीए स्टेडियमवर होत असलेला हा चौथा आंतरराष्ट्रीय टी-२० सामना असून, तेरावा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना ठरणार आहे. येथे आतापर्यंत २ आंतरराष्ट्रीय कसोटी, ७ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि ३ आंतरराष्ट्रीय टी-२० तसेच ५१ आयपीएल सामने खेळविण्यात आले आहेत.
याआधी झालेल्या तीन आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांमध्ये भारतीय क्रिकेट संघाला दोनदा विजय मिळाले होते. २०१२ मध्ये झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडचा पराभव केला होता. २०१६ मध्ये टी-२० सामन्यात श्रीलंकेने भारतीय संघाचा पराभव केला होता. २०२० मध्ये झालेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने श्रीलंका संघाचा ७८ धावांनी पराभव केला होता.
या सामन्यामुळे पुण्यातील क्रिकेटप्रेमी आणि रसिकांना नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच रोमांचकारी आणि उत्कंठावर्धक सामना अनुभवायला मिळेल, अशी आशा एमसीएचे सेक्रेटरी रियाझ बागबान यांनी व्यक्त केली.
तिकीट ८०० रुपयांपासून
भारत आणि श्रीलंका टी-२० सामन्याच्या अधिकृत तिकीट विक्रीला आज, मंगळवारपासून (२७ डिसेंबर) सकाळी १० वाजता सुरुवात होणार आहे. या सामन्याची तिकिटे क्रिकेटप्रेमी दोन पद्धतीने मिळवू शकणार आहेत. सामन्याची प्रत्यक्ष तिकीटविक्री पीवायसी हिंदू जिमखाना, भांडारकर रोड आणि एमसीए स्टेडियम, गहुंजे येथे होणार आहे. या दोन्ही ठिकाणी सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत तिकिटे मिळतील. या सामन्याची तिकिटे किमना ८०० रुपयांपासून मिळणार आहेत. त्यानंतर ११००, १७५०, २०००, ३५०० रुपये या किमतीत तिकिटे मिळणार आहेत.