सुषमा नेहरकर-शिंदेपुणे : केंद्र शासनाने सन २०१६ आणि १८ मध्ये प्रकाशित केलेल्या राजपत्रामध्ये राज्यात वास्तव्यास असणारे हिंदू, शिख, बौध्द, जैन, पारसी आणि ख्रिश्चन वर्गातील अल्पसंख्यांक पाकिस्तानी, बांगलादेशी आणि अफगाणी नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. या अधिकाराचा वापर करुन पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यात वास्तव्यास असलेल्या सुमारे ११८ परदेशी नागरिकांना भारतीय नागरिक्तव देण्यात आले असल्याची माहिती अधिकृत सुत्रांनी दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मांडलेले नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झाले. या वादग्रस्त विधेयकामध्ये पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या तीन देशांमधील अल्पसंख्यांकांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद करण्यात आली आहे. परंतु विधेयक मंजूर झाल्यानंतर याबाबत विधेयकाच्या बाजूने आणि विरोधामध्ये जोरदार चर्चा सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात गेल्या दोन-तीन वर्षांत किती परदेशी नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले याबाबतचा आढावा घेण्यात आला. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगणिस्तान या देशामधून आलेले नागरिक ‘लॉग टर्म व्हिस’ वर जिल्ह्यात ग्रामीण भागात, पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरामध्ये राहत आहेत. या सर्व नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्याचे अधिकार केंद्र शासनाने पुणे जिल्ह्यात जिल्हाधिका-यांना दिले आहेत. त्यानुसार सन २०१६ मध्ये जिल्हा प्रशासनाने २१ नागरिकांना आणि २०१७ ते २०१९ मध्ये एकूण १६९ नागरिकांना भारतीय नागरिकत्व मिळावे यासाठी अर्ज केला होता. भारतीय नागरिकत्व देण्यापूर्वी सर्व कागदपत्रांची छाननी करण्यात आली. गुप्तचर विभागाकडूनही (आयबी) तपासणी करण्यात आली. कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर ९७ नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले. अद्याप ५२ लोकांचे प्रस्ताव प्रलंबित असून, कागदपत्रांची खात्री करुन घेण्यात येत आहे. सध्या पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह जिल्ह्याच्या काही भागात पाकिस्तान, बांगलादेश आणि आफगणिस्तान येथील नागरिक 'लाँग टर्म व्हिसा' वर राहत आहेत. यात पाकिस्तान, बांगलादेशाचे नागरिकत्व असल्याने त्यांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. प्रत्येक वेळी त्यांना पासपोर्ट, व्हिसाचे नूतनीकरण करणे आणि अन्य सरकारी सोपस्कार पार पाडावे लागत होते. परंतु भारतीय नागरिकत्व मिळाल्याने आता या नागरिकांची या सर्व त्रासातून सुटका झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांमध्ये ११८ परदेशी नागरिकांना दिले भारतीय नागरिकत्व
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2019 6:00 AM
नागरिकत्व मिळालेल्यांमध्ये सर्वांधिक ११७ पाकिस्तानचे तर एक बांगलादेशचा नागरिक
ठळक मुद्दे नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मंजूरपाकिस्तान, बांगलादेश आणि अफगणिस्तान या देशामधून आलेले नागरिक ‘लॉग टर्म व्हिस’ वर