भानुदास पऱ्हाड
आळंदी : सातासमुद्रापार दुबई देशात बालगोपाळांचे पहिले ढोल- ताशा पथक स्थापन करण्यात आले आहे. आखाती देशात त्रिविक्रम ढोल ताशा पथक नावाने सुरु झालेले हे पहिले व एकमेव पारंपारिक ढोल ताशा पथक आहे. विशेषतः महाराष्ट्राच्या वादन परंपरेचा प्रसार करण्याचे कार्य मंडळाच्या माध्यमातून सुरू आहे. दुबईत ढोल ताशा पथकाची स्थापना सागर पाटील यांनी सन २०१७ मध्ये केली आहे. महाराष्ट्राचा आवाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ढोल ताशा संस्कृतीचा प्रचार या पथकाच्या माध्यमातून केला जात आहे. याबद्दल या पथकाला महाराष्ट्र शासनाने खास ''''मराठी भाषा सन्मान'''' देऊन गौरविले आहे.
दरम्यान या पथकाचे १५० प्रयोग पूर्ण केले आहेत. मात्र ढोल ताशा संस्कृतीचा वारसा नवीन पिढीला सोपवण्यासाठी या पथकाने खास लहान मुलांकरिता नविन पथक सुरू केले आहे. त्रिविक्रम बालमित्र ढोल ताशा पथक दुबई असे या पथकाचे नाव ठेवण्यात आले असून यामध्ये सहा ते १४ वर्षाच्या मुला - मुलींचा सहभाग ठेवण्यात आला आहे. या लहान मुलांना ढोल, ताशा, लेझीम, ध्वज, झांज या वाद्यांची ओळख करून त्यांना योग्य ते प्रशिक्षण देण्यात येत आहे.
मराठमोळी संस्कृतीचे जतन...
अबुधाबी येथे मंगळवारी (दि.१९) बाप्पाच्या प्राणप्रतिष्ठा दिनी या बालमित्र पथकाने हजारो गणेश भक्तांच्या समोर ढोल ताशा वादनाचे सादरीकरण करून दुबईकरांची मने जिंकली. पथकाचे नेतृत्व सागर पाटील करत असून पुषन पाटील, काव्या सांगले, हेतवी जोशी, ओम इरवाडकर, ईश्वरी इरवाडकर, अनय पाटील, विनय पाटील, अन्विता सावंत, आदि पाटील, विनंती हसबे, साक्षी हसबे, भाग्या गावडे, आरुष कर्वे आदीं चिमुकले पथकात सहभागी झाले आहेत. सातासमुद्रापार मराठमोळी संस्कृती जपण्याच्या कार्यात हातभार लावण्याचे कार्य हे बालमित्र मंडळी करत आहेत.
''परदेशात वाढणाऱ्या मुलांना आपल्या महाराष्ट्राच्या कला व संस्कृतीची जाणीव असावी व त्याची ओढ लागावी म्हणून या पथकाची स्थापना केली आहे. आगामी काळात आखाती देशातही ही मुले आपली कला जिवंत ठेवतील. - सागर पाटील, संस्थापक त्रिविक्रम बालमित्र ढोल ताशा पथक''