पुणे : महाराष्ट्रात जैवविविधतेबाबत चांगली जनजागृती होत असून, आता तर थेट दिल्लीमध्ये राजपथावर महाराष्ट्रातील जैवविविधतेची मानके सादर होणार आहेत. यंदाच्या प्रजासत्ताकदिनी होणाऱ्या संचलनात ‘महाराष्ट्रातील जैवविविधता मानके’ या विषयावर चित्ररथ सहभागी होणार आहे (Republic Day parade 2022). त्यामध्ये राज्यप्राणी आणि भिमाशंकर येथील शेकरूही दिसणार आहे. ही मराठी माणसांसाठी एक अभिमानाची गोष्ट ठरली आहे. हा चित्ररथ सांस्कृतिक कला कार्य संचालनालयाकडून तयार केला आहे आणि त्यांची ही संकल्पना आहे.
खरंतर संपूर्ण भारतात खूप जैवविविधता नटलेली आहे. त्यातही आपल्याकडील सह्याद्रीमध्ये सर्वाधिक आहे. तसेच गेल्या काही वर्षांपासून पर्यावरण संवर्धन करण्यासाठी सरकारकडूनही प्रयत्न केले जात आहेत. शेकरूसोबतच चित्ररथामध्ये ‘कास पठार’चाही समावेश आहे. युनेस्कोची मान्यता असलेल्या सूचीमध्ये सातारा येथील ‘कास पठार’ आहे. ते पाहण्यासाठी हजारो पर्यटक तिथे जातात.
‘हरियाल’ हे विशेष असलेले कबुतर राज्य पक्षी म्हणून घोषित केलेले आहे. त्याचाही समावेश असून, याला हिरवा होला, हरोळी, यलो फुटेड् ग्रीन पिजन किंवा पिवळ्या पायाची हरोळी या नावांनीही संबोधले जाते. हा पक्षी आता दुर्मीळ झाला आहे. तसेच राज्य फुलपाखरू आणि अतिशय सुंदर दिसणारे ‘ब्ल्यू मॉरमॉन’ याचाही समावेश चित्ररथात असणार आहे. खरंतर राज्य फुलपाखरू सन्मान देणारे महाराष्ट्र एकमेव राज्य ठरलेले आहे.
महाराष्ट्रातील हा जैवविविधतेचा वारसा कवितेच्या आणि संगीताच्या रूपात चित्ररथात मांडलेला आहे. चित्ररथाच्या वृक्षाच्या फांदीवर शेकरूची प्रतिमा व त्याच्या मागे राज्य वृक्ष आंब्याच्या वृक्षाची प्रतिमा असणार आहे. हे सुमारे १४ ते १५ फूट उंचीपर्यंत असणार आहे. तसेच दुर्मीळ असलेले माळढोक पक्षी, महाराष्ट्रात नव्याने सापडलेली खेकड्याची प्रजाती, नवीन सापडलेला मासा, आंबोली झरा, फ्लेमिंगो, वाघ, गिधाड, घुबड पक्ष्यांच्या ४ ते ५ फूट उंचीच्या प्रतिकृती यामध्ये आहेत. नुकतेच राज्य सरकारने माळढोक पक्ष्याच्या संवर्धनासाठी ७५ लाखांचा निधी वितरित केला आहे. त्याद्वारे माळढोकला संरक्षित करण्यासाठी प्रयत्न होतील.
ऐटबाज ‘सुपारबा’ अन् सुंदर ‘शेकरू’
चित्ररथामध्ये सुरुवातीला ‘ब्ल्यू मॉरमॉन’ फुलपाखरू असेल, त्याची ८ फुटांची प्रतिकृती असणार आहे. राज्य फूल ‘ताम्हण’देखील सोबतीला असेल. त्यावर फुलपाखरे आहेत. ‘शेकरू’ची प्रतिकृती १५ फुटांची असून, ‘कास पठारा’वर दिसणारा सरडा ‘सुपारबा’ हादेखील ऐटीत दिसेल. त्यासोबत सुंदर अशा हरियालाची प्रतिकृती असणार आहे.