पुणे : कॅलिफोर्नियातील परॉडाईज येथील जंगलात लागलेल्या आगीत आतापर्यंत ९ जणांचा मृत्यु झाला असून ६ हजार ७१३ घरे भस्मसात झाली आहेत. आतापर्यंत ५२ हजार नागरिकांना परिसरातून हलविण्यात आले आहे. या परिसरात विद्यार्थी, कामगार म्हणून जवळपास हजाराहून अधिक भारतीय रहात आहेत. त्यांचे प्रशासनाने स्थलांतर केले असल्याने त्यांचे पुणे व महाराष्ट्रातील पालक चिंतेत पडले आहेत.
परॉडाईज परिसरात ९० हजार एकरावरील जंगलात ही आग लागली आहे. गेल्या दोन दिवसांपासून अमेरिकन प्रशासन ती विझविण्याचा प्रयत्न करीत आहेत परंतु, त्याला अद्याप यश आलेले नाही. या परिसरात जवळपास हजाराहून अधिक भारतीय राहत आहेत. तर पुण्यातील २० ते ३० विद्यार्थी, आयटी तरुण राहतात़ येथील हॉटेल, आय टी कंपन्यांमध्ये अनेक भारतीय काम करतात. अमेरिकी नादरीकांप्रमाणे या भारतीयांनाही स्थलांतर करावे लागले आहे. याबाबत तेथील आय टी कंपनीत नोकरी करणारे पुण्यातील तनय खांडके यांनी सांगितले की, गेल्या दोन दिवसांपासून ही आग लागली असून वेगाने पसरत आहे. आम्ही परॉडाईजपासून १४ मैलावर असलेल्या चिकी शहरात राहतो. पुण्यातील २० जण येथे राहतो़. या आगीत मोठ्या प्रमाणावर घरे व इमारती जळून खाक झाल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपासून येथील सर्व शाळा, महाविद्यालये, आॅफिसेसना सुट्टी दिली आहे. येथून जाणारा महामार्ग संपूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे. सर्व जण घरी बसून असून तुम्हाला केव्हाही बाहेर पडावे लागेल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे आम्ही महत्वाचे सर्व सामान बांधून ठेवून तयारीत थांबलो आहे.
गेल्या दोन दिवसांपासून या आगीमुळे सूर्यदर्शन असे झालेले नाही. परिसरात सर्वत्र धूर आणि धूर दिसून येत आहे. आगीतून उडणाऱ्या राखेमुळे सर्वत्र राखेचा पाऊस पडल्या सारखे दिसत आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी रात्री पहाटे तीन वाजेपर्यंत आम्ही जागेच होताे. शनिवारी सकाळी (भारतीय वेळेनुसार) आग अजून वाढली नाही़. त्यामुळे आम्हाला घरातच थांबून आहोत. बाहेर हवा खूप खराब आहे. अगदी ३०० मैलांपर्यंत सर्वत्र धूर आणि धूरच दिसत असल्याचे तनय खांडके याने सांगितले.
त्या परिसरात राहणाऱ्या अनेकांचे पालक पुणे, मुंबई, महाराष्ट्रात आणि देशात आहेत. परॉडाईज परिसरात राहणाऱ्या अनेकांना स्थलांतर करावे लागल्याने त्यांचे पालक सतत त्यांच्याशी संपर्कात असून ते मुलाच्या काळजीने चिंतेत सापडले आहेत. अमेरिकेतील न्यूज चॅनेलवरील बातम्या पाहून ते तेथील परिस्थितीची माहिती घेत आहेत. दरम्यान स्थलांतरीत लाेकांची राहण्याची व्यवस्था चर्च तसेच महाविद्यालयांच्या मैदानावर तंबू ठाेकून करण्यात अाली अाहे. तसेच सध्या तेथे 4 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान खाली अाले अाहे.