पुणे : पोस्टाने टाटा एआयजीच्या अपघात संरक्षण विमा या योजनेशी करार केला असून प्रति वर्ष २९९ व ३९९ च्या हप्त्यात दहा लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण दिले जात आहे.
या योजनेत २९९ किंवा ३९९ रुपयांच्या हप्त्यामध्ये १० लाख रुपयांपर्यंतचे विमा सुरक्षा कवच हे विमाधारकास प्रदान करण्यात येत आहे. कोणत्याही कारणाने अपघातात विमाधारक व्यक्तीचा मृत्यू झाल्यास वारसांना ५ हजार रुपये व या पोस्ट ऑफिस विमा योजनेअंतर्गत किमान दोन मुलांच्या शिक्षणासाठी १ लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळणार आहे.
दोन्ही योजनांत हा आहे फरक
२९९ व ३९९च्या अपघात विमा योजना या सारख्याच आहेत. मात्र, ३९९ च्या योजनेत विमाधारकाच्या अपघाती मृत्यूनंतर दोन मुलांना शिक्षणासाठी १ लाखांपर्यंतची मदतही मिळू शकते, तर ही मदत २९९च्या अपघात विमा योजनेत मिळणार नाही. त्याचप्रमाणे ३९९ योजनेत अंत्यसंस्कार खर्च, वाहतूक खर्च, शिक्षण खर्च देण्यात येतो. हा खर्च २९९च्या योजनेत मिळत नाही.
योजनेचा कालावधी वर्षाचा
या विमा योजनेंतर्गत तुम्हाला विम्याची रक्कम ही वार्षिक भरायची आहे. म्हणजेच २९९ किंवा ३९९ रुपयात तुम्हाला वर्षभराकरिता सुरक्षा कवच प्रदान करण्यात येत आहे.
अर्ज कसा करणार?
यासाठी अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. तुमच्याकडे इंडिया पोस्ट पेमेंट बँक असावे लागते. ते नसल्यास काढावे लागेल.
ही योजना यांनाच लागू
देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी वयोमर्यादा ही १८ ते ६५ वर्षे आहे.
विमाधारकाचा अपघाती मृत्यू किंवा कायमचे अपंगत्व आल्यास १० लाख रुपये प्रदान करण्यात येतात. रुग्णालयाचा खर्च करण्यासाठी ६० हजार रुपये मिळतात. या योजनेअंतर्गत विमाधारकाच्या २ मुलांच्या शिक्षणाकरिता १ लाख रुपये दिले जातील. जर विमाधारक रुग्णालयामध्ये दाखल असल्यास दररोज १ हजार रुपये प्रति दिवस असे दहा दिवसांपर्यंत देण्यात येतील. विमाधारकास ओपीडी खर्च ३०,००० रुपये मिळेल. विमाधारक व्यक्तीच्या कुटुंबास रुग्णालयाच्या प्रवासाकरिता प्रवास खर्च म्हणून २५,००० रुपये मिळतील.
- वरिष्ठ अधिकारी, पुणे पोस्ट