पुणे : लांबच्या प्रवासासाठी रेल्वेला पहिली पसंती दिली जाते. अनेक ग्रुप रेल्वेच्या माध्यमातून देशभर प्रवास करत असतात; पण रात्री दहानंतर मोठ्याने बोलणे, मोबाइलवर गाणे वाजवणे, आता प्रवाशांना महाग पडू शकते. इतर सहप्रवाशांनी त्याची तक्रार केली तर कदाचित पुढच्या रेल्वे स्थानकावर तुम्हाला उतरवून तुमच्यावर कारवाईदेखील होऊ शकते.
रात्री दहानंतर काय करू नये?
रेल्वेत रात्री दहाच्या आधी ज्या प्रवाशांनी रेल्वेच्या पॅन्ट्रीमधून जेवणाची ऑर्डर दिलेली असते, त्यांना जेवणे दिलेले असते. त्यानंतर इतर सहप्रवाशांचा विचार करता लोकांनी हळू आवाजात गप्पा मारणे अथवा हेडफोनचा वापर करून गाणे, व्हिडीओ बघणे गरजेचे असते. यासह रेल्वेतील नाइट लाइट वगळता अन्य लाइटदेखील बंद करणे गरजेचे असते; पण अनेकदा काही लोक, मोठा ग्रुप असेल तर ती मंडळी जोरजोरात आवाज देत बोलत असतात. काही लोक हेडफोनचा वापर न करता गाणे, व्हिडीओ बघत असतात. यामुळे रेल्वेच्या डब्यात प्रवास करणाऱ्या इतर सहप्रवाशांना त्याचा त्रास होत असतो. त्यातील प्रवाशाने जर टीसीकडे यासंबंधी तक्रार केली, तर अशा लोकांना अपमानाला सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते.
अन्यथा होईल कारवाई
हा नियम रेल्वेच्या अन्य नियमांनुसारच आहे; पण अनेकदा प्रवाशांना याबाबत माहिती नसते. सहप्रवाशाने तक्रार केल्यानंतर, टीसीने समजवून सांगितल्यानंतरही जर लोकांनी ऐकले नाही तर पुढील रेल्वे स्थानकावर त्या ग्रुपला, लोकांना उतरवून दिले जाऊ शकते. त्यात गोंधळ करणाऱ्यांनी मद्य सेवन केले असेल, तर त्यांच्यावर गुन्हादेखील दाखल होऊ शकतो.
तक्रार कोठे कराल ?
जर रेल्वे प्रवाशांत अशा प्रकारे रात्री दहानंतर जोरजोरात बोलणे सुरू असेल, गोंगाट सुरू असेल, गाणी वाजवली जात असतील, तर सहप्रवाशांनी सर्वप्रथम टीसीकडे तक्रार करावी. त्यानंतर टीसीने समजावून सांगितल्यानंतरही संबंधित लोक ऐकत नसतील तर टीसी आरपीएफ (रेल्वे पोलिसांना) बोलावून त्यांच्यावर कारवाई करण्यास भाग पाडू शकतो.
मुळात आपल्यामुळे इतर सहप्रवाशांना त्रास होईल असे वर्तन करणे चुकीचे आहे. पुणे विभागात आजपर्यंत अशा कोणत्याही व्यक्तीवर कारवाई करण्यात आलेली नसली, तरी प्रत्येकाने नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी