पुणे : अखेर रेल्वे बोर्डाने जनरल डब्यांवर घातलेले निर्बंध दूर केले आहेत. त्यामुळे प्रवाशांना आता मेल, एक्स्प्रेसच्या जनरल डब्यांतून जनरल म्हणजेच अनारक्षित तिकिटावर प्रवास करता येणार आहे. मात्र, प्रवाशांना यासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. सध्या जनरल डब्यांतदेखील आरक्षित तिकिटावर प्रवास केला जात आहे. ज्या दिवशी डब्यांत आरक्षण नसेल तेव्हापासूनच अनारक्षित तिकिटावर प्रवास करता येणार आहे. त्यामुळे जनरल डब्यांतून अनारक्षित तिकिटावर प्रवास करण्यासाठी प्रवाशांना वाट पाहावी लागणार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून प्रवासी जनरल डब्यांवर असलेले निर्बंध हटवून त्यातून जनरल तिकिटावर प्रवास करण्याची मंजुरी द्यावी, अशी मागणी सातत्याने करीत होते. ती मागणी अखेर मान्य झाली आहे. मात्र, त्यासाठी नो बुकिंग डेटसाठी अट टाकलेली आहे. नुकतेच रेल्वे प्रशासनाने लोकल, पॅसेंजर व डेमूसाठी जनरल तिकीट उपलब्ध करून दिले.
आता मेल एक्स्प्रेसच्या गाड्यांना जनरल डबे जोडून त्यात प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. दोन वर्षांपासून ही सेवा बंद होती. जनरल तिकीट बंद झाल्याने प्रवाशांना आरक्षित तिकीट काढून प्रवास करणे महागात पडत होते. आता मात्र प्रवाशांना जनरल डब्यांतून प्रवास करता येणार आहे.